लोकमत न्यूज नेटवर्कउमरी : येथील तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात शासनाच्या नाफेड अंतर्गत मूग , उडीद व सोयाबीन आदी शेतमालाची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांकडून आॅनलाईन नोंदणी केली जात असून यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय दूर होऊन शासनाने ठरवून दिलेला हमीभाव शेतीमालाला मिळणार आहे .५ नोव्हेंबर २०१८ पासून केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने मूग, उडीद, सोयाबीन खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांकडून आॅनलाईन नाव नोंदणी केली जात आहे. शेतकऱ्यांनी आधार कार्ड, बँक पासबुक, आॅनलाईन सातबारा पेरा सहित जोडून अर्ज दाखल करून घेणे आवश्यक आहे. उमरी येथील खरेदी विक्री संघ कार्यालयात या अर्जांची नोंदणी केली जाणार आहे . उमरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी ही नोंदणी करून घ्यावी असे आवाहन व्यवस्थापक प्रकाश तुमकुंटे यांनी केले आहे.सातबारावरील पेऱ्यासंदर्भात शासनाने ठेवलेली अट शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे . कारण सातबारावरील पेरा नोंदणी ही शेतकऱ्यांच्या परस्पर तलाठी सज्जा मध्ये केली जाते. त्यामुळे पेरा नोंदणी एका पिकाची तर प्रत्यक्षात शेतात दुसरेच पीक असा प्रकार होऊ शकतो. सद्यस्थितीत शेतीमध्ये असलेल्या पिकाची तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी पाहणी करून प्रमाणपत्र द्यावे. त्यानुसार पिकांची नोंदणी घेण्यात यावी. जेणेकरून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, अशी शेतकरी वगार्तून मागणी होत आहे.
सन २०१८- १९ या खरीप हंगामासाठी केंद्र शासनाने शेतमालाचे आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत मूग, उडीद व सोयाबीनचे दर खालीलप्रमाणे मंजूर केलेले आहेत . मूग प्रतिक्विंटल ६९७५ रुपये, उडीद ५६०० रुपये, सोयाबीन ३३९९ रुपये. मूग, उडीद व सोयाबीन खरेदीसाठी आॅनलाईन नोंदणीचा कालावधी शासनाने १५ नोव्हेंबरपर्यंत निश्चित केला आहे. मूग व उडीद खरेदी २३ डिसेंबरपर्यंत केली जाणार आहे़ तर सोयाबीनची खरेदी ५ जानेवारीपर्यंत केली जाणार आहे. खुल्या बाजारात शेतमालाच्या खरेदीसंदर्भात होणारी आर्थिक पिळवणूक लक्षात घेऊन शासनाने आॅनलाईन नोंदणी व खरेदी सुरू केली आहे. याचा तालुक्यातील शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.