शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या या ऑनलाइन कार्यशाळेचे प्रास्ताविक बिलोली गटशिक्षणाधिकारी दिगांबर तोटरे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून स्वाध्याय व व्हर्च्युअल क्लास, शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचता येईल, यासंदर्भात सखोल मार्गदर्शन केले. विषय सहायक संतोष केंद्रे यांनी स्वाध्याय उपक्रम, पीपीटी व प्रात्यक्षिक, सहशिक्षिका शिवकन्या पटवे व शोभा तोटावाड यांनी प्रश्नोत्तरे, विषय साधनव्यक्ती गुणवंत हलगरे ‘शाळा बंद, पण शिक्षण सुरू’ या उपक्रमांतर्गत स्वाध्याय उपक्रम व गोष्टीचा शनिवार हे दोन्ही उपक्रम शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी कसे फायद्याचे आहेत, याबद्दल माहिती दिली. तर सागरबाई भैरवाड यांनी शिक्षकमित्र उपक्रमाबाबत सविस्तर माहिती सांगून, येणाऱ्या अडचणीवर कशी मात करावी, याबद्दल माहिती देत विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्याचे सर्वांना आवाहन केले. प्रणिता मुनेश्वर यांनी व्हर्च्युअल क्लास याबाबत विस्तृत माहिती दिली. तर अश्विनी कोतावाड यांनी व्हर्च्युअल क्लासद्वारे ग्रामीण भागातील मुलींपर्यंत शिक्षण कसे देण्यात येत आहे, याबाबत सखोल माहिती सांगितली.
सदर ऑनलाइन कार्यशाळेस तालुक्यातील सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषयतज्ज्ञ, विशेष शिक्षक, सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष किसवे यांनी केले, तर आभार ढाकणे पी.आर. यांनी मानले.