नांदेड : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची अट आता शिथिल करण्यात आली असून, सदस्य आणि सरपंच पदासाठी ऑफलाइन अर्ज दाखल करण्यास राज्य निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. त्यामुळे ऑनलाईनची कटकट बंद झाली आहे.
राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. २८ नोव्हेंबरपासून सदस्य आणि थेट सरपंच पदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पूर्वीच्या आदेशानुसार २ डिसेंबरपर्यंत संगणक प्रणालीद्वारे म्हणजे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्या होत्या. ग्रामीण भागामध्ये इंटरनेटची कनेक्टिव्हिटी न मिळणे, संगणक उपलब्ध नसणे अशा अनेक अडचणी येत असल्याने इच्छुक उमेदवारांना रात्र -रात्र जागून उमेदवारी अर्ज दाखल करावा लागत होता. त्यामुळे इच्छुक उमेदवार नामनिर्देशनपत्र भरण्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती.
ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने १ डिसेंबर रोजी स्वतंत्र पत्र काढले असून, पारंपारिक पद्धतीने म्हणजे ऑफलाइन अर्ज स्वीकारण्याची परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे अर्ज दाखल करण्यासाठी २ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंतची वेळ वाढविण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे गाव पुढाऱ्यांची ऑनलाइनची कटकट बंद झाली आहे.