कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असणारे रेमडेसिविर इंजेक्शन मिळावे यासाठी जिल्हधिकारी डाॅ. विपीन इटणकर यांनी १५ हजार इंजेक्शनची मागणी केली आहे. त्यांच्या मागणीप्रमाणे मात्र जिल्ह्याला रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा होत नाही. इंजेक्शनचा तुटवडा असल्यामुळे याचाच फायदा काहीजण उचलत असून काळ्या बाजारात ही इंजेक्शन चढ्या दराने विक्री करण्यात येत आहेत. इंजेक्शनच्या काळ्या बाजारप्रकरणी आतापर्यंत तीन गुन्हे दाखल झालेले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी रेमडेसिविर इंजेक्शनच्या बाबतीत औषध खरेदी विक्रीमध्ये अनियमितता आढळून आल्यास संबंधित विक्रेत्यावर कारवाई करण्यात येईल असे आदेश काढले असले तरी रेमडेसिविरचा काळाबाजार मात्र सुरूच असल्याचे दिसत आहे.
चौकट..........
रविवारी दुपारी डी-मार्ट परिसरात एक व्यक्ती काळ्या बाजारात रेमडेसिविरच्या दोन इंजेक्शनची ४० हजार रुपयांत विक्री करीत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त रोहित राठोड, प्रवीण काळे, औषध निरीक्षक माधव निमसे यांच्या पथकाने बोगस ग्राहक पाठवून आरोपी दिगंबर बाबुराव फुले यास डी-मार्टजवळ दुपारी २ ते ३ वाजेदरम्यान रंगेहाथ पकडले होते. आरोपी हा एक इंजेक्शन २० हजार रुपयेप्रमाणे विक्री करीत होता.