नांदेड : जिल्ह्यात पीएम किसान योजनेअंतर्गत चुकीची माहिती भरणाऱ्यांकडून वसुली मोहीम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे. आतापर्यंत केवळ ३ लाख २६ हजार रुपये वसूल करण्यात आले असून तब्बल ३ कोटी १ लाख ७४ हजार रुपये वसुलीचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनापुढे आहे.
पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून अर्ज घेण्यात आले होते. जिल्ह्यात या योजनेसाठी १ लाख ५६ हजार ६४५ शेतकरी पात्र ठरले आहेत. या योजनेच्या तपासणीत तब्बल ५ हजार १७१ जणांनी चुकीची माहिती भरुन योजनेचा लाभ घेतला असल्याची बाब पुढे आली आहे. या सर्वांकडून त्यांच्या खाती जमा करण्यात आलेली रक्कम वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. या वसुलीसाठी आता ११ ते १३ डिसेंबर दरम्यान विशेष मोहीमही राबविली जाणार आहे.
भोकर तालुका
जिल्ह्यात पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत चुकीची माहिती भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून वसुली केली जात आहे. आतापर्यंत १५७ शेतकऱ्यांकडून वसुली केली आहे. सर्वाधिक वसुली भोकर तालुक्यातील ६१ शेतकऱ्यांकडून झाली आहे. अर्धापूर तालुक्यात ४१, बिलोली व देगलूर तालुक्यात प्रत्येकी १९ शेतकऱ्यांकडून वसुली झाली.
तर फौजदारी गुन्हे
जिल्ह्यात चुकीची माहिती देऊन पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्यांना नोटिसा दिल्या आहेत. ५ हजार १७१ जणांनी या योजनेचा चुकीच्या कागदपत्राआधारे लाभ घेतला होता. त्यांच्याकडून वसुली केली जात आहे. रक्कम परत करण्यास टाळाटाळ करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.