यशवंत महाविद्यालय, नांदेड येथे मराठी विभागाच्या वतीने आयोजित ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या’च्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
''भाषा संवर्धित करायची म्हणजे प्रत्यक्षात काय करायचे, तर पहिली गोष्ट म्हणजे आपली भाषा हिरिरीने बोलायची. जास्तीत जास्त लोकांनी जास्तीत जास्त ठिकाणी ती भाषा बोलणे, हा कुठल्याही भाषेच्या संवर्धनाचा पहिला टप्पा आहे. भाषेच्या संवर्धनासाठी संख्यात्मक वाढ आणि वर्चस्व आवश्यक आहे. त्यामुळे सर्वत्र आपण हिरिरीने मराठी बोलले पाहिजे. ती बोलायला लाजायचे कारण नाही. आपण आपल्या भूमीत भक्कम उभे आहोत, आपली भाषा ही जगातल्या प्रमुख भाषांपैकी एक आहे, आपण तिच्यात सर्व व्यवहार करू शकतो, या आत्मविश्वासाने ती बोलण्याची आवश्यकता आहे. भाषेच्या विविध बोली जोपासणे आणि वाढविणेही तितकेच गरजेचे आहे. बोली म्हणजे प्रमाणभाषेला सततची रसद पुरविणारे सैनिक असतात; मराठीच्या तर अनेक बोली आहेत. वऱ्हाडी, कोकणी, अहिराणी असे काही ठळक भेद आपल्याला माहीत आहेत; पण त्या बोलींमध्येही पोटबोली आहेत. उदाहरणार्थ - कोकणात वारली, ठाकरी, कातकरी, आगरी, कुणबी, मालवणी असे अनेक भेद आहेत. मराठीचे संवर्धन व्हायचे असेल तर या प्रत्येक बोलीभाषेचा विकास झाला पाहिजे. सुशिक्षितांनी आपल्या बोलीभाषांची लाज न बाळगता आपापल्या समूहात आणि प्रदेशात दैनंदिन व्यवहारांत बोलीभाषेचा वापर केला पाहिजे. कारण मराठीचे संवर्धित भवितव्य हे बोलींच्या विविधतेत आणि त्यांच्या समृद्धीतही सामावलेले आहे,'' असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले.
अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे यांनी मराठीच्या देदीप्यमान इतिहासाचा आढावा घेत राजाश्रयासोबत लोकाश्रय असल्याशिवाय भाषिक समृद्धी घडत नाही, हे सांगून भाषेचे संवर्धन व्हायचे, तर सामाजिक व्यवहाराच्या सर्व क्षेत्रांत तिचा प्रवेश व्हायला हवा. इंग्रजीतील ज्ञानसंपदा मराठीत आणण्यासाठी आपण प्रयत्नशील राहायला हवे, असे आवाहन केले.
विभागाच्या प्रमुख डॉ. संगीता घुगे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. विश्वाधार देशमुख यांनी केले. ऑनलाईन स्वरूपात संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी डॉ. अजय गव्हाणे, प्रा. मंजुश्री भटकर यांच्यासह अनेक प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती होती.