नांदेड - महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत ‘उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ नांदेड’ या उपक्रमात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाविषयी आपल्या विविध समस्या राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागातील मंत्रालय व संचालक स्तरावरील अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून, त्यांच्या समस्यांचे जागेवरच निराकरण करण्यासाठी मंत्री प्रयत्नशील राहणार आहेत. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. विद्यार्थ्यांना आपले प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रालय, मुंबईपर्यंत पोहोचणे शक्य होत नाही. त्यामुळे १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या इनडोअर स्पोर्ट हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रम, शैक्षणिक शुल्क, शैक्षणिक वर्ग, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यापीठ परिषद निवडणूक, परीक्षाविषयक प्रश्न, शैक्षणिक वेळापत्रक, विद्यापीठीय व महाविद्यालयीन प्रश्न यासारखे विविध प्रश्न मांडता येणार आहेत.
उच्च शैक्षणिक क्षेत्रातील विविध घटकांना त्यांच्या अनेक अडी-अडचणी सोडविण्यासाठी मुंबई येथे मंत्रालयात जाणे-येणे करावे लागते, यासाठी त्यांचा वेळ व पैसा खर्च होतो. त्याचबरोबर बऱ्याचवेळा चकरा मारूनही मान्यवरांची भेट होत नाही. या सर्व अडी-अडचणींवर मात करण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाविषयी आपल्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने या उपक्रमात सहभागी होऊन या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन आणि कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे यांनी केले आहे.