नांदेड - मृत्यू हे शाश्वत सत्य आहे. जन्म घेतलेली प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी मरणारच आहे. मात्र कोरोना प्रादुर्भावामुळे मृत्यूही ओशाळून जाईल असे भयावह चित्र शुक्रवारी नांदेड येथील गोवर्धनघाटच्या शांतीधाम स्मशानभूमीत होते. येथे सकाळी ८ ते २ या अवघ्या सहा तासात २३ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर १३ मृतदेह वेटिंगवर होते. अंत्यसंस्कारासाठी या परिसरात रांगा लागल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे रौद्र रूप नांदेडकरांनी गहिवरलेल्या मनाने शुक्रवारी पाहिले.
कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर हा प्रकोप थांबेल, अशी अपेक्षा होती. मात्र कोरोनाची दुसरी लाटही थरकाप उडवणारी आहे. नांदेड जिल्ह्यात आजवर कोरोनाने १ हजाराहून अधिक बळी घेतले असून दररोज सरासरी १२०० ते १४०० नवीन बाधित निष्पन्न होत आहेत. सद्य:स्थितीत या रुग्णांचीही बेडबरोबरच इंजेक्शन आणि इतर औषधींसाठी धावपळ सुरू आहे. मात्र रुग्णालयात उशिराने दाखल होणे तसेच यापूर्वीचा एखादा दुर्धर आजार असलेल्यांचा अवघ्याचा चार-पाच दिवसात मृत्यू होत आहे. नांदेड महानगरपालिकेच्या वतीने गोवर्धन घाट येथील शांतीधाम स्मशानभूमीत मृतावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. शुक्रवारी सकाळी ८ ते २ या वेळेत तब्बल २३ मृतदेहावर महापालिकेच्या पथकाने अंत्यसंस्कार केले. तर आणखी १३ मृतदेह अंत्यसंस्कारासाठी शांतीधाम परिसरात वेटिंगवर असल्याचे चित्र होते. नांदेड महानगरपालिकेचे सहा झोन आहेत. या प्रत्येक झोनमधील कर्मचाऱ्यांचे गट करण्यात आले असून आठवड्याला एका झोनवर अंत्यसंस्काराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अंत्यसंस्कारावेळी भडाग्नी देण्यासाठी येणाऱ्या नातेवाइकासह मृतदेह हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या वतीनेच पीपीई कीट देण्यात येते. शुक्रवारी शांतीधाम परिसरात अंत्यसंस्कारासाठी मृतदेहाच्या रांगा लागल्या होत्या. एकाच वेळी अनेक मृतदेहांना अग्नी दिल्याने या परिसरात धुराचा लोट उठला होता. त्यातच अंत्यसंस्कारासाठी आलेल्या मोजक्या नातेवाइकांच्या आक्रोश आणि मृतदेह घेऊन येणाऱ्या सायरनच्या अस्वस्थ करणाऱ्या आवाजाने शांतीधाम परिसरातील वातावरण मन बधीर करून टाकणारे होते.
चौकट......
नऊ दिवसात अडीचशे मृतदेहावर अंत्यसंस्कार
नांदेड जिल्ह्यात कोरोनाने उग्र रूप धारण केलेले आहे. शुक्रवारीच जिल्ह्यातील कोरोना बळींचा आकडा १ हजार पार झाला. मार्च महिन्यामध्ये कोरोनाने अनेकांचे बळी घेतले. या महिन्यात गोवर्धनघाट स्मशानभूमीत ३९० जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. एप्रिल महिन्यातही कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. १ ते ९ एप्रिल या ९ दिवसात येथे अडीचशेवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे मनपाचे क्षेत्रीय अधिकारी रावण सोनसळे यांनी सांगितले.
(फोटो कॅप्शन - 09nphapr11 - शुक्रवारी नांदेड येथील गोवर्धन घाटावरील शांतीधाम स्मशानभूमीत सकाळी ८ ते २ या सहा तासात २३ मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
09nphapr12 - अंत्यसंस्कारासाठी मोजक्याच नातेवाइकांना उपस्थित राहण्याची मुुभा प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे अनेक मृतदेहासोबत अवघे दोन-चार जण असल्याचे दिसून आले.
09nphapr13 - गोवर्धन घाट स्मशानभूमीबाहेर नातेवाइकांनी अशी गर्दी केल्याचे चित्र होते. दुपारी २ नंतर सुमारे १३ मृतदेह वेटिंगवर असल्याने अनेक नातेवाईक तेथे दाखल झालेले होते.
09nphapr14 - अंत्यसंस्कारासाठी सरण रचण्यासाठी लाकडे अशी ट्रकमधून आणली जात होती.