लोकमत न्यूज नेटवर्कबारुळ : बारुळ व परिसरात २२ जून रोजी अतिवृष्टी झाली. त्यात अनेकांची घरे, शेतीचे, उभ्या पिकांचे, महावितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले. बारुळसह परिसरातील १५ गावांतील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी मुळे यांनी दिले आहेत.बारुळ, औराळा, चिखली, हळदा, सावळेश्वर, मंगलसांगवी, काटकळंबा, तेलूर, वळसंगवाडी यांसह परिसरातील गावांत २१ जून रोजी ५० मिमी तर २२ जून रोजी १४० मिमी पावसाची नोंद झाली. सलग अतिवृष्टी झाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. नागरिक रात्री झोपेत असताना झालेल्या मुसळधार पावसाने अनेकांच्या घरांत पाणी जमा झाले. त्यात काही नागरिकांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य वाहून गेले. तर अनेकांच्या घरांचे नुकसान झाले. त्यामुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली.या अतिवृष्टीत जवळपास ३०० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतीतील गाळ वाहून गेला. त्यामुळे शेतकºयांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे.आ. प्रताप पाटील चिखलीकर, उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे , तालुका कृषी अधिकारी देशमुख, उपविभागीय अभियंता श्रीसागर, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, मंडळ अधिकारी, तहसीलदार अरुणा संगेवार, सरपंच शंकरराव नाईक यांनी बारुळ, औराळा, चिखली, सावळेश्वर, मंगलसांगवी येथील शेती व घरांच्या नुकसानीची पाहणी केली. तसेच काही नागरिकांना आ. चिखलीकर यांनी संसारोपयोगी साहित्यांसाठी आर्थिक मदत दिली. तर तहसीलदार संगेवार यांनी जवळपास १५० नागरिकांंना अन्नधान्य देण्याची सोय केली.----मदतीचा ओघबारुळ परिसरात सलग दोन दिवसांत २१० मिमी पाऊस झाला. वादळीवाºयामुळे महावितरणचे अनेक खांब व इतर साहित्यांचे लाखोंचे नुकसान झाले. आ. प्रताप पाटील चिखलीकर व जि. प. सदस्य अॅड. विजय धोंडगे यांच्याकडून नुकसान झालेल्यांना संसारोपयोगी साहित्यासाठी आर्थिक मदत देण्यात आली.---कापसी- पिंपळदरी रस्त्यावरील पूल वाहून गेलामारतळा: परिसरात २२ जूनच्या रात्री झालेल्या अतिवृष्टीने धनज (खुर्द) येथील पूल पुराच्या पाण्याने तुटला तर कापसी-पिंपळदरी येथील पादचारी लोखंडी पूल वाहून गेल्याची घटना घडली. यामुळे येथील संपर्क तुटला असून अनेकांची शेती खरडून गेल्यामुळे मोठे नुकसान झाले. कापसी मंडळात मृगाच्या प्रारंभीच जोरदार पाऊस झाला. गुरुवारी झालेल्या पावसाने पेरणीची लगबग सुरु झाली. मात्र शुक्रवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीने शेतीसह रस्त्यांचे नुकसान झाले. यात धनज येथील पुलाचा काही भाग पुराने वाहून गेल्याने गावाचा संपर्क तुटला आहे तर पिंपळदरी-कापसी येथील लोखंडी पादचारी पूल वाहून गेल्याने अवघ्या दीड किमी अंतरासाठी चार किमीची पायपीट करावी लागते. कापसी मंडळात १०३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
बारुळ परिसरातील १५ गावांतील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 12:42 AM