हिंगोली : एफडी बॉण्ड केलेली रक्कम मिळत नसल्याची तक्रार जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचकडे प्राप्त झाली होती. अखेर मुद्दल भरणा केलेली व त्यावरील रक्कम खातेदारास देण्यात यावी, असे आदेश जिल्हा ग्राहक न्याय मंचने संबंधित मल्टीस्टेट बँकेला दिले आहेत.जिल्हाभरात सध्या गुंतवणूक केलेली रक्कम देण्यास संबंधित संस्था टाळाटाळ करत असल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. असेच एक प्रकरण वसमत तालुक्यातील आहे. वसमत येथील माधुरी भास्करराव अलसटवार या गृहिणीने विघ्नहर मल्टीस्टेट को.आॅप.सोसायटी लि. शाखेत १६ सप्टेंबर २०१३ रोजी १ लाख रुपयांचा एफडी बॉण्ड केला होता. सदर रक्कम ही १६ सप्टेंबर २०१६ रोेजी १ लाख १२ हजार रूपये याप्रमाणे बँकेकडून मिळणार होती. परंतु बँकेत रोकड नसल्याने रक्कम मिळत नाही. त्यामुळे काही कालावधीनंतर रक्कम मिळेल असे आश्वासन तक्रारदार माधुरी अलसटवार यांना बँकेकडून मिळाले. त्यानंतर १९ डिसेंबर २०१७ रोजी परत सदर महिलेने एफडीच्या रक्कमेची मागणी केली. परंतु वारंवार मागणी करूनही रक्कम मिळत नसल्याने माधुरी अलसटवार यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर हा खटला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचात चालला. दोन्हीकडील युक्तीवादानंतर माधुरी अलसटवार यांना बँकेचे शाखा व्यवस्थापक व कार्याध्यक्ष यांनी संयुक्तीक अथवा वैक्तीकरित्या तक्रारदार महिलेस १ लाख १२ हजार रूपये रक्कम देय दिनांकापासून पुढे ४ टक्के दराने पूर्ण देयी पर्यंतच्या काळाकरीता व्याज आकारून द्यावी. तसेच तक्रादार महिलेस शारीरिक व मानसिक त्रास झाल्याने १ हजार रूपये, तक्रारीचा खर्च ५०० रूपये देण्याचे आदेश ६ डिसेंबर २०१८ रोजी न्याय मंचचे अध्यक्ष एस. के. कुळकर्णी, सदस्या एन. के. कांकरीया यांनी दिले.एटीएममधून रोकड निघालीच नाहीहिंगोली तालुक्यातील खानापूर येथील नारायण चंद्रकांत जाधव यांचे इलाहाबाद बँकेत खाते आहे. बँकतर्फे त्यांना एटीएम कार्डही दिले होते. जाधव हे १३ आॅक्टोबर २०१७ रोजी इलाहाबाद शाखेच्या एटीएम मशिनमधून ५ हजार रूपये काढण्यासाठी गेले होते. यावेळी मशिनमध्ये सर्व्हर डाऊन असा मजकूर होता. परंतु काही वेळाने जाधव यांच्या मोबाईलवर खात्यातील ५ हजार रुपये वजा झाल्याचा संदेश आला. याबाबत जाधव यांनी बँक व्यवस्थापकांना माहिती दिली. त्यानंतर ७२ तासांपर्यंत खात्यावरील वजा झालेली रोकड परत जमा होईल, असे सांगण्यात आले. परंतु रक्कम जमा झालीच नसल्याने जाधव यांनी ग्राहक न्याच मंचाकडे तक्रार दाखल केली. अखेर १४ नोव्हेंबर २०१८ रोजी न्याय मंचचे अध्यक्ष एस. के. कुळकर्णी यांनी तक्रारकर्त्यास शाखा व्यवस्थापक यांनी ५ हजार रूपये, शारीरिक मानसिक त्रासापाई १ हजार व तक्रारीचा खर्च १ हजार पंधरा दिवसांत देण्याचे आदेश दिले.
‘एफडी’ची रक्कम देण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 1:09 AM
एफडी बॉण्ड केलेली रक्कम मिळत नसल्याची तक्रार जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचकडे प्राप्त झाली होती. अखेर मुद्दल भरणा केलेली व त्यावरील रक्कम खातेदारास देण्यात यावी
ठळक मुद्देहिंगोली जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच