अल्पशिक्षित गणेशची साक्षर शेती
माहूर : रासायनिक खतांचे अनेक दुष्परिणाम समोर येऊ लागल्यानंतर आता प्रयोगशील शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळू लागले आहेत. सेंद्रिय शेतीतून निघणाऱ्या फळे व भाज्यांना बाजारपेठेत चांगला दर मिळत आहे. ही बाब लक्षात घेऊन माहूर तालुक्यातील आष्टा येथील गणेश वंजारे या युवा शेतकऱ्याने केवळ ३० गुंठे क्षेत्रात सेंद्रिय पद्धतीने पेरूच्या रोपांची लागवड केली. कुठल्याही रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने पेरूची बाग बहरली आहे.
सध्या पेरूची तोडणी सुरू झाली आहे. बाजारपेठेत प्रतिकिलो ४० ते ५० रुपये दर मिळत आहे. यातून एक लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळेल, असा त्यांना विश्वास आहे. कुठल्याही क्षेत्रात सध्या नोकरीचा हमी उरलेली नाही. त्यामुळेच उच्चशिक्षित तरुण शेतीकडे वळू लागले आहेत. पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत तरुण शेतकरी विशेषकरून फळ शेतीकडे वळू लागले आहेत. यांचाही पुढे जात सेंद्रिय शेतीस प्राधान्य देऊ लागले आहेत. माहूर तालुक्यातील आष्टा येथील गणेश विठ्ठलराव वंजारे यांनी आपल्या ३० गुंठे क्षेत्रात १५ बाय १५ च्या अंतरावर थाय जी १ जातीच्या सुमारे १५० रोपांची लागवड १० ऑगस्ट २०१८ ला केली आहे. रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर करायचा नाही, असा त्यांनी निर्धार केला होता. त्यानुसार रासायनिक खतांचा फाटा देत सेंद्रिय खताचा वापर केला. सध्या पेरू तोडणीला आले आहेत. आजवर दहा क्विंटल पेरू निघाले आहेत. प्रतिकिलो ४० ते ५० रुपये दर मिळत आहे. या माध्यमातून आजवर ४० हजार रुपये उत्पन्न हाती पडले आहे. ३० गुंठे क्षेत्रातून आणखी किमान पंधरा क्विंटल पेरू निघतील. स्थानिक बाजारपेठेतील सध्याचा दर कायम राहिल्यास वंजारे यांना खर्च वजा जाता किमान एक लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळेल, असा दावा शेतकऱ्याकडून करण्यात आला आहे. इतर तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता शेतीकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
प्रतिक्रीया
मी तीस गुंठे क्षेत्रात पेरूची बाग फुलवली आहे. कुठल्याही रासायनिक खतांचा वापर केला नाही. सेंद्रिय खतांच्या जोरावर ही बाग फुलवली आहे. कुठल्याही केमिकलचा वापर केला नसल्याने पेरूला मागणी अधिक होत आहे - गणेश विठ्ठलराव वंजारे, शेतकरी, आष्टा, ता.माहूर.