परभणी आणि लातूर जिल्ह्यांत बर्ड फ्लूमुळे शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या ठिकाणी तपासणी केली असता बर्ड फ्लू असल्याचे स्पष्ट झाले होते. नांदेड जिल्ह्मातही हिमायतनगर तालुक्यातील चिंचोरडी तसेच किनवट तालुक्यातील झळकवाडी येथे कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रशासनाने कोंबडी, कावळे आणि बदकांचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पुणे तसेच भोपाळ येथे पाठविले होते. या घटनेपाठाेपाठ माहूर तालुक्यातील पपुलवाडी आणि कंधार तालुक्यांतील नावद्याची वाडी येथेही मृत कोंबड्या आढळल्या होत्या. यातील माहूर आणि कंधार तालुक्यांतील नमुन्यांच्या तपासणीचे पुणे प्रयोगशाळेकडून अहवाल प्राप्त झाले असून हे दोन्ही नमुने पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे. दुसरीकडे भोपाळ येथील एन.१चा अहवाल काय येतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तूर्त प्रशासनाच्या वतीने वरील दोन गावांत प्रवेशबंदी करून कोंबड्या नष्ट करण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याचवेळी १६५ पाेल्ट्री फार्मचालकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रसार होऊ नये यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने ३२ शीघ्र कृती दलाची पथके तैनात करण्यात आली आहेत. नागरिकांनी घाबरू नये, अफवांववर विश्वास ठेवू नये, तसेच योग्य खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
नांदेड जिल्ह्यातही बर्ड फ्लूचा शिरकाव?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 4:15 AM