'अतिवृष्टीचे संकट दूर कर, जगाच्या पोशिंद्याला वाचव'; नाना पटोलेंचे रेणुका मातेला साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2021 06:30 PM2021-10-12T18:30:36+5:302021-10-12T18:32:48+5:30
Navratri : नवरात्रातील देवीच्या सातव्या माळेच्या दिवशी माहूर गडावर आई रेणुका मातेचे दर्शन घेण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले हे मंगळवारी सपत्नीक माहूर दोऱ्यावर आले.
माहूर ( नांदेड ) : नवरात्रोत्सव ( Navratri ) निमित्त कॉंग्रेस ( Congress ) प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले ( Nana Patole) यांनी मंगळवारी श्री रेणुका मातेचे ( Renuka Mata Mahur ) सपत्नीक दर्शन घेतले. मी जेव्हाजेव्हा जे जे मागितले ते ते मला मिळाले आहे. मागील दोन वर्षांपासून जगाचा पोशिंदा शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करीत आहे. शेतकऱ्यांना वाचव व भारत कोरोनामुक्त कर असे साकडे रेणुका मातेला घातल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
नवरात्रातील देवीच्या सातव्या माळेच्या दिवशी माहूर गडावर आई रेणुका मातेचे दर्शन घेण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले हे मंगळवारी सपत्नीक माहूर दोऱ्यावर आले. त्यांनी सकाळी ११ वाजता रेणुका मातेचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी राज्यातील शेतकऱ्यांवर अतिवृष्टीमुळे आलेले संकट दूर कर व देशातून कोरोना हद्दपार कर असे साकडे घातले. त्यानंतर कार्यकर्त्यांशी त्यांनी वार्तालाप केला. तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मारोती रेकुलवार यांच्या कार्यालयात भेट दिली.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नामदेवराव केशवे, जिल्हा परिषद सदस्य तथा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय राठोड, नगराध्यक्ष शीतल जाधव, माजी नगराध्यक्ष फिरोज दोसानी, जिल्हा बँकेचे संचालक नगरसेवक प्रा.राजेंद्र केशवे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मेघराज जाधव, राष्ट्रवादीचे सारखणी जिल्हा परिषद सर्कलचे नेते कुंदन पवार, माजी सभापती मारोती रेकुलवार, डॉ. निरंजन केशवे, दिलीप मुंगीलवार, सिद्धार्थ तामगाडगे, अविनाश टनमने यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. यावेळी देवस्थान प्रशासनाने 13 किरकोळ दुकाने हटविल्या प्रकरणी त्यांनी तत्काळ दुकाने चालू करण्यासाठी प्रशासनास सूचनाही दिल्या