नांदेड : कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर केले जाणारे सिटीस्कॅन आणि उपचारादरम्यान स्टेरॉइडचा होणारा अतिवापर रुग्णांसाठी घातक ठरत आहे. गरज नसताना स्टेरॉइड दिल्याने रुग्णांना कोविडनंतर अनेक व्याधींनाही सामोरे जावे लागू शकते. नांदेडात तर रुग्ण वैद्यकीय सल्ल्याशिवाय चाचण्या करून घेत आहेत. त्यामुळे या ठिकाणीही वेटिंग लागत आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक रुग्णाला सिटीस्कॅन तपासणी करणे गरजेची नाही. तसेच स्टेरॉइडचा वापरही भविष्यात हानीकारक ठरू शकतो.
कोरोना असलेले हजारो रुग्ण गृहविलगीकरणात बरे होतात, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. त्यावरूनच कोणत्या रुग्णांना आरोग्य संस्थेत दाखल करून घ्यावे, त्याचे मार्गदर्शक नियम तयार करण्यात आले आहेत. कमी लक्षणे असणारे, मध्यम लक्षणे असणारे आणि गंभीर लक्षणे असणारे रुग्ण असे तीन टप्प्यांत कोरोना रुग्णांचे वर्गीकरण केले आहे. ज्या रुग्णांचा ऑक्सिजन स्तर ९० पेक्षा कमी आहे, अशाच रुग्णांना रुग्णालयांत दाखल करावे लागते. तसेच प्रत्येक रुग्णाचे सिटी स्कॅन स्कोअर काढण्याचीही आवश्यकता नाही. रुग्णाचा एक्स-रे काढूनही त्याच्या इन्फेक्शनची माहिती मिळू शकते. मात्र, कोरोना झाल्यानंतर प्रत्येक जण स्वतःच सिटीस्कॅन करीत आहेत. हा प्रकार चुकीचा आहे. सिटीस्कॅनच्या एका एचआरसीटी तपासणीतून ४०० एक्सरे रेडियशन्स रुग्णाच्या शरीरात जातात. त्यामुळे भविष्यात रुग्णाला कर्करोग होण्याचा धोकाही निर्माण होऊ शकतो. त्याचप्रमाणे रेमडेसिविर इंजेक्शन, स्टेराॅइडचा अतिवापरही रुग्णांसाठी घातक ठरू शकतो.
नांदेडात वैद्यकीय सल्ल्याशिवायच अनेकजण सिटीस्कॅन तपासणी करून घेत आहेत. त्यामुळे या ठिकाणी रुग्णांच्या रांगा लागत आहेत. एका सिटीस्कॅन तपासणीसाठी तब्बल अडीच हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे रुग्णांची लूट होत आहे. जिल्हाधिकारी ईटणकर यांनीही रुग्णांची गरज नसताना सिटीस्कॅन तपाासणी करू नका, असे आदेश काढले आहेत; परंतु त्यानंतरही सिटीस्कॅन केंद्रावरील गर्दी कमी झाल्याचे दिसून येत आहे.
बुरशीजन्य आजाराचा धोका
स्टेरॉइडच्या अतिवापरामुळे बुरशीजन्य आजाराचा धोका निर्माण होतो. त्यातून न्यूकॉरमायकोसिस म्हणजे नाकाला फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका संभवतो.
जो आयुष्यभरासाठी असतो. हायर डोसच्या वापरामुळे नांदेडात अनेकांना जबड्यांचे आजार झाले आहेत, तर काही जणांचे डोळे तिरके झाले आहेत. चेहरा विद्रुप होण्याचे प्रकारही घडले आहेत.
जिल्ह्यात दररोज सरासरी ९० ते १०० रुग्ण सिटीस्कॅन करतात. अलीकडच्या काळात हे प्रमाण वाढले आहे.
सिटीस्कॅन करून एचआरसीटी स्कोअर तपासून घेण्याचा प्रकार वाढला आहे. अनेक वेळा रुग्ण गरज नसताना भीतीपोटी सिटीस्कॅन करून घेतात. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानेच सिटीस्कॅन करणे गरजेचे आहे.
एक सिटीस्कॅन म्हणजे ८० ते १४० एक्स-रे
एका वेळी सिटीस्कॅन करणे म्हणजे ८० ते १४० वेळा एक्स-रे काढण्यासारखे आहे. सिटीस्कॅनच्या किरणांमुळे शरीराच्या रोग प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो. यातून कर्करोग होण्याचा धोकाही संभवतो. त्याचप्रमाणे काही रुग्णांमध्ये नपुंसकताही येण्याची शक्यता असते.
कोरोनाबाधित झालेल्या सर्वच रुग्णांना सिटीस्कॅन करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञांनी सल्ला दिल्यानंतरच सिटीस्कॅन केले पाहिजे. स्टेरॉइडच्या वापराबाबतही परस्पर औषधी घेण्याचे प्रमाण वाढले आहे. हा प्रकारही रुग्णांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. वैैद्यकीय सल्ल्यानेच औषधी घ्यावीत.
-डॉ. नीळकंठ भोसीकर
अतिरिक्त जिल्हा शल्यचिकत्सक