या उपक्रमाचा प्रारंभ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, विधान परिषद सदस्य अमर राजूरकर, आमदार शामसुंदर शिंदे, आमदार मोहन हंबर्डे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, उपवनसंरक्षक राजेश्वर सातेलीकर, जिल्हा परिषदेच्या सदस्या प्रणिताताई देवरे, लोहा पंचायत समितीचे सभापती आनंद शिंदे, उपसभापती नरेंद्र गायकवाड, पंचायत समिती सदस्या सुकेशिनी कांबळे, वडेपुरीचे सरपंच गोपाळराव सावळे आदी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण केले जाणार आहे.
जिल्ह्यामध्ये १ कोटी २६ लाख ८२ हजार ८२४ एवढी वृक्षलागवडीचे उद्दीष्ट निर्धारित केले आहे. यापैकी ५३ लाख ४९ हजार झाडे उपलब्ध आहेत. उर्वरित झाडे सामाजिक वनीकरण, वनविभाग, कृषि, मनपा, रेशीम विभाग यांच्यामार्फत उपलब्ध केली जात आहेत. कोविडच्या पार्श्वभूमीवर शुद्ध प्राणवायूच्या उपलब्धतेसाठी समाजातील सर्व घटकांत अधिकाधिक जनजागृती व्हावी व त्यांचा वृक्षलागवडीतून कृतिशील लोकसहभाग घेता यावा यासाठी जिल्हा परिषद, वनविभाग, कृषि विभाग, शालेय शिक्षण विभाग या सर्वांच्या माध्यमातून नियोजन केले आहे.
जिल्ह्यात सध्या एकूण ८७ हजार ६३६ कोरोनाबाधित व्यक्तींनी कोरोनावर मात केली असून यातील बहुसंख्य बाधित या वृक्षलागवडीतील लोकसहभागासाठी पुढे सरसावले आहेत. यादृष्टीने जिल्ह्यातील वृक्षलागवड मोहिमेसाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी विविध विभागप्रमुखांना सूचना दिल्या आहेत.