नांदेड : उर्ध्व पैनगंगा म्हणजेच इसापूर धरणात गुरुवारी सकाळी ८१ टक्के पाणीसाठा झाल्याने या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे पैनगंगा नदीलापूर आला असून गांजेगाव येथील पुलावरुन पाणी वाहत असल्याने विदर्भ-मराठवाड्याचा संपर्क तुटला आहे. मागील सात वर्षात पहिल्यांदाच हे धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे.
मागील चार ते पाच दिवसापासून पैनगंगा स्थित इसापूर प्रकल्पात पाणीसाठा वाढत असल्याने तसेच पावसाचा जोर धरणाच्या वरील बाजूसही कायम असल्याने धरणातून पैनगंगा नदीत विसर्ग करण्यात येत आहे. पुराचे पाणी गांजेगाव पुलावरुन वहात असल्याने विदर्भ-मराठवाड्याचा संपर्क तुटला असून हिमायतनगर-ढाणकी मार्गे होणारी वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना दूरच्या मार्गाने प्रवास करावा लागत आहे. पैनगंगेच्या वरील क्षेत्रात असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील पेनटाकळी धरणही तुडुंब भरले आहे.
या धरणातूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून हे पाणी इसापूर धरण क्षेत्रात येत असल्याने धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. या पाण्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील सुमारे ४० गावांना पुराचा धोका होण्याची भीती व्यक्त केली जात असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. दरम्यान, पुराच्या पाण्यामुळे जिवीत व वित्त हानी होऊ नये म्हणून किनवट तालुक्यातील नदी काठावरील गावातील नागरिकांनी गुरे-ढोरे, घरगुती व शेती उपयोगी सामान सुरक्षितस्थळी ठेवावे, असे आवाहन केले असून सर्व अधिकारी, कर्मचा-यांनी मुख्यालयी थांबण्याचे निर्देश किनवटच्या तहसीलदारांनी दिले आहेत.