नांदेड : शब्दांनो थोडे मोठे व्हा रे माझा भीम तुमच्यात मावत नाही, लेखनिनी कितीही केला खर्च तर माझा भीम सरत नाही, या रक्ताचा थेंब न थेंब तुझाच आहे बा भीमा, या देहाचा श्वास तुझाच आहे बा भीमा, म्हणून तुला आज माझ्या रक्ताने अभिवादन करतो बा भीमा..., या शब्दांची प्रचीती आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नांदेडकरांनी अनुभवली. जेजे स्कुल ऑफ आर्ट येथे शिल्पकलेचे शिक्षण घेणाऱ्या कैलास खानजोडे याने बाबासाहेबांचे चित्र स्वतःच्या रक्ताने रेखाटून एक अनोखे अभिवादन केले आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार, दिन दुबळ्यांचे कैवारी, अर्थतज्ञ, कामगार नेते, प्रकांड पंडित अशा अनेक रूपातील डॉ. बाबासाहेब सर्वांना परिचित आहेत. यासोबत बाबासाहेबांना संगीत आणि चित्रकलेची देखील आवड होती. बाबासाहेबांनी डोळे उघडे असलेले बुद्धांचे चित्र साकारले होते. त्यांनी रंग, रेषा,आकाराने नुसते चित्र नव्हे तर अनेकांच्या आयुष्यात देखील रंग भरले आहेत. यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दरवर्षी कलेच्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीने अभिवादन करण्याचा संकल्प जेजे स्कुल ऑफ आर्टचा विद्यार्त्ठी कैलास खानजोडे याने केला आहे. यापूर्वी कैलासने ३६ तास चित्र, रांगोळीच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन केले आहे. दरम्यान, यावर्षी कैलासने, ''या रक्ताचा थेंब न थेंब तुझाच आहे बा भीमा, या देहाचा श्वास तुझाच आहे बा भीमा'' असे विचार व्यक्त करत आपल्या रक्ताने बाबासाहेबांचे चित्र साकारले आहे. त्याच्या या अनोख्या पद्धतीने केलेल्या अभिवादनाचे अनेकांनी कौतुक केले आहे.
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी मी कलेच्या माध्यमातून अभिवादन करतो. महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित शिबिरात काल रक्तदान केले. यातूनच आपले सर्वस्व असलेल्या बाबासाहेबांचे रक्ताने चित्र साकारण्याचे निश्चित केले. - कैलास खानजोडे, शिल्पकला विद्यार्थी