लोकमत न्यूज नेटवर्कहदगाव : बरडशेवाळा येथील फुटलेला कालवा दुरुस्त करून २६ जानेवारीला पुन्हा त्यातून पाणी सोडले़ दोन दिवसानंतर पळसा येथील साखळी क्रमांक ३८ फुटून चार हजार क्यूमेक्स पाणी वाया गेले़ कालवा पुन्हा फुटण्याची शक्यता असतानाही पाणी सोडले व कालवा फुटून गुराढोरांना मिळणारे पाणी वाया गेले़८ जानेवारी रोजी बरडशेवाळा येथे कालवा फुटून सात हजार क्यूमेक्स पाणी वाया गेले होते़ त्यानंतर १७ दिवस काम सुरू होते़ २४ जानेवारी रोजी काम संपल्यानंतर २६ जानेवारीला पुन्हा पाणीपाळी देण्यात आली़ दोन दिवस चार ते सहा क्यूमेक्स पाणी प्रवाह असल्याने पाणी बरेच लांबपर्यंत गेले़ शेवटपर्यंत पोहोचलेही; पण आज सोमवारी पाण्याचा प्रवाह वाढविताच पळसा येथे मोठे भगदाड पडून चार हजार क्यूमेक्स पाणी वाया गेले़सोमवारी सकाळी ७़३० वाजता कालवा फुटला, त्यानंतर दुपारी १२ वाजता वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आले व मातीचे पोते भरून संथगतीने भगदाड बुजविण्याचा प्रयत्न केला, पाणी प्रवाह बंद केले तरीही सायंकाळी पाचपर्यंत पाण्याचा प्रवाह जोरात होता़ त्यामुळे नाल्याला पाणी वाहत होते़ दुपारी मात्र जेसीबी बोलावून काम सुरू केले़ कालवा फुटण्याची कारणमीमांसा वरिष्ठ अधिका-यांना बोचरी लागली असली तरी ‘२८ ठिकाणी कालवा फुटण्याचा धोका कायम’ असे वृत्त ‘लोकमत’ने यापूर्वीच छापले होते़ दोनच दिवसांत पुन्हा कालवा फुटला़याविषयी नांदेड विभागाचे कार्यकारी अभियंता कुरुंदकर यांनी शेतकºयांना दोष देत त्यांनीच हा प्रकार केला असावा असा अंदाज व्यक्त केला़ परंतु साखळी क्ऱ३८-३७ मध्ये बाभूळ, उमर, लिंब यांचे मोठमोठी झाडे आहेत़ त्यांची मुळे खोल जावून कालव्याला छिद्रे पडली़ याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले़बरडशेवाळा कालवा फुटला की फोडला या आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने छापले़ त्याविषयी कुरुंदकर यांनी आम्ही कशाला फोडू कालवा? असा सवाल केला. शेतक-यांनी फोडला तर त्यांच्यावर कारवाई का नाही करत? या प्रश्नावरही त्यांनी मौन बाळगले़ जमा झालेल्या सर्व शेतक-यांना व कर्मचा-यांना बोलण्यास मज्जाव करून कामास लावले़धरणामध्ये १३ टक्केच पाणीसाठा असताना दोन पाणीपाळ्या सोडल्या व दोन्ही वेळा कालवा फुटून ते वाया गेले़ याला जबाबदार शेतकरी की कर्मचारी-अधिकारी? कालव्यामध्ये फुटलेली झाडे तीन-चार वर्षे वयाची आहेत़ दरवर्षी कामासाठी निधी खर्च दाखविला जातो़ वृक्षाची तोड का केली जात नाही? दोन्ही ठिकाणी फुटलेला कालवा नाल्याजवळच कसा काय फुटला? शेतक-यांच्या पिकांचे नुकसान झाले नाही, पण आजूबाजूचे बंधारे भरून गेले़ २६ जानेवारीला सोडलेले पाणी गुराढोरांसाठी व पाणीपुरवठा योजनेची पाणीपातळी वाढण्यासाठी सोडले होते, तेही मध्येच बंद झाले़
हदगाव तालुक्यातील पळसा कालवा फुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 11:58 PM