नांदेड- इन-कॅमेरा सुनावणी असतानाही व्हिडीओ कॅमेरा नसल्याची बाब पंचायतराज समितीच्या निदर्शनास आल्यानंतर या समितीने जि.प. प्रशासनाला धारेवर धरले. माहिती असताना व्हिडीओग्राफरला का बोलावले नाही? याबाबत विचारणा करण्यात आली. ऐनवेळी व्हिडीओ कॅमेऱ्याची व्यवस्था प्रशासनाला करता आली नाही.
विधीमंडळ पंचायतराज समितीचा दौरा गुरुवारी अध्यक्ष संजय रायमुलकर यांच्या नेतृत्वात सुरू झाला. प्रारंभी शासकीय विश्रामगृहात सकाळी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांसमवेत अनौपचारिक चर्चा झाली. या बैठकीत विधीमंडळ सचिवालयाचे उपसचिव विलास आठवले यांचे स्वीय सहायक मोबाईलद्वारे बैठकीचे छायाचित्रण करु लागले. त्यावेळी जि.प. प्रशासनाचा व्हिडीओग्राफर नाही का ? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. तो नसल्याचे निदर्शनास येताच समिती अध्यक्षांनी जि.प. प्रशासनाची कानउघाडणी केली. जवळपास तासभर ही बैठक सुरू झाली. यावेळी खासदार हेमंत पाटील, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार राजेश पवार आदींची उपस्थिती होती. त्यानंतर पंचायतराज समिती जिल्हा परिषदेत पोहचली. जि.प. अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, उपाध्यक्षा पद्मा रेड्डी सतपलवार यांच्या कार्यालयास भेट दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे समितीने जि.प. अधिकारी, पदाधिकाऱ्यांशी विविध विषयावर चर्चा केली. दुपारचे भोजन झाल्यानंतर पुन्हा सायंकाळी उशिरापर्यंत ही बैठक सुरू होती.
हेही वाचा - खासदार नांदेडमध्येच बोलतात दिल्लीत बोलता येत नाही; आमदार अमर राजूरकरांची बोचरी टीका
पंचायतराज समितीत एकूण ३२ सदस्यापैकी १८ सदस्य गुरुवारी नांदेडमध्ये दाखल झाले होते. शुक्रवारी या सदस्यामध्ये आणखी वाढ होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. नांदेडचे दोन आमदारही या समितीत सदस्य म्हणून समाविष्ट आहेत. २०१६-२०१७ च्या लेखा परीक्षा पुनर्रविलोकन अहवालातील जिल्हा परिषदेच्या संबंधातील परिच्छेदासंर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांची साक्षही नोंदवण्यात आली. पंचायतराज समिती शुक्रवारी सकाळी १० वाजेपासून जिल्ह्यातील पंचायत समित्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि ग्रामपंचायतींना भेटी देणार आहे. त्याचवेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांची प्रश्नावली क्रमांक २ च्या अनुषंगाने साक्षही होणार आहे. समितीचे सदस्य आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार अंबादास दानवे, विक्रम काळे, महादेव जानकर, सदाभाऊ खोत, प्रदीप जैसवाल, प्रशांत बंग, मेघना बोर्डीकर, प्रतिभा धानोरकर, रत्नाकर गुट्टे, राहूल नार्वेकर आदी सदस्यांची यावेळी उपस्थिती होती.
समितीसाठी लाल गालिचेजिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी ही समिती दाखल झाली आहे. आतापर्यंतच्या समित्यांची बैठक जिल्हा परिषदेच्या सभागृहात झाली. यावेळी मात्र पहिल्यांदाच जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाची निवड करण्यात आली आहे. राहण्याच्या व्यवस्थेपासून ते प्रवास व्यवस्थेपर्यंत सर्वच बाबतीत समितीची बडदास्त ठेवण्यात येत आहे.