- नितेश बनसोडे
श्रीक्षेत्र माहूर ( नांदेड) : साडेतीन पिठांपैकी पूर्ण पीठ असलेल्या श्रीक्षेत्र माहूरचे पौराणिक, ऐतिहासिक महत्त्व आहे. राष्ट्रकुट काळात निर्मिती झालेली प्राचीन पांडव लेणी हा इथला ऐतिहासिक ठेवा आहे. मात्र प्रशासनाच्या बेदखलपणामुळे हा ठेवा अडचणीत सापडला आहे. लेणी परिसरात सोयी-सुविधांचा अभाव असल्यामुळे पर्यटक फिरकत नसल्याचे चित्र असून पुरातत्त्व विभागाचेही याकडे दुर्लक्ष होत आहे.
माहूरचे ऐतिहासिक वैभव असलेली पांडव लेणी शहरापासून उत्तरेला एक कि़मी़ अंतरावर डोंगरामध्ये सुमारे १७० फुटांपर्यंत कोरलेली आहेत. येथे अतिशय देखण्या पाच शिल्पकला आहेत़ क्रमांक एकची लेणी पूर्वाभिमुख आहे़ व्हरांडा, सभामंडप आणि गर्भगृह असे या लेणीचे स्वरुप आहे़ क्रमांक दोनची लेणी दक्षिणमुखी आहे़ तर तीन क्रमांकाची लेणी कला आणि स्थापत्याच्या दृष्टीने विशेष उल्लेखनीय असून पूर्वाभिमुख असलेल्या या लेणीत सर्वाधिक शिल्प आहेत. यात द्वारपाल, कुबेर, गजलक्ष्मी, मुष्ठीयोद्धे, स्त्रीशिल्पे, सिंह, शिवपार्वती, गणेश या चित्राची रेलचेल आहे़ लेणी चार दक्षिणमुखी असून या लेणीत कोरीव गणेश शिल्प आहे. पाच क्रमांकाच्या लेणीचे दालन रिकामे आहे. या लेणीच्या पाठीमागील भिंतीत नागदेवतेचे पंचमुखी कोरीव शिल्प आहे़ अमेरिकेतील मिशीगण विद्यापीठातील कला आणि स्थापत्याचे अभ्यासक प्रो़ वॉल्टर स्पिक यांनी सर्वप्रथम माहूर येथील लेण्याचे सर्वेक्षण करून खोदकामाचा कालखंड राष्ट्रकुट इ़स़७५७ ते ९५४ काळातील असल्याचे नमूद केले. वेरूळ, कंधार, मान्यखेट या राष्ट्रकुटाच्या राजधान्या होत्या़ धाराशिव आणि माहूर येथील लेण्यांमध्ये साम्य आहे़
भगवान श्रीकृष्णांनी पाच पांडवांना माता कुंतीसह श्रीक्षेत्र माहूरला याच पांडव लेणीच्या भुयारी मार्गाने पाठविले. त्यामुळे या लेणीला पांडव लेणी नाव पडले, अशी आख्यायिका सांगितली जाते. सदर लेणी १२ जानेवारी १९५३ रोजी औरंगाबाद पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहेत. परंतु मागील ६५ वर्षाच्या काळात पुरातत्त्व विभागाकडून या पांडव लेण्याचा कसलाही विकास झालेला नाही. किंबहुना येथे रस्ता, विद्युत व्यवस्था नसल्याने ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचा असलेला हा ठेवा आज विकासापासून दूर राहिला आहे. त्यामुळेच पर्यटकही या लेण्यांकडे पाठ फिरवित असल्याचे विदारक चित्र आहे. लेण्यांच्या संवर्धनाकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
विकासकामे दूरच; माहितीचाही अभावमाहूर येथील पांडव लेणीचा विकास व्हावा ही येथील नागरिकांसह पर्यटकांचीही मागणी आहे. या अनुषंगाने पुरातत्त्व विभागाचे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक एन. एन. मार्कण्डेय यांना विचारले असता माहूर येथील पांडव लेणी ही औरंगाबादच्या पुरातत्त्व विभागाकडे आहेत़ मध्यंतरी पांडव लेणी केंद्र सरकारच्या यादीवर घेण्यासाठी संबंधितांना प्रस्ताव पाठविण्यात आला आहे विकासकामाबाबत कार्यालयाकडून पत्रव्यवहारही केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पुरातत्व विभागाचे जतन सहायक एम. एम. अन्सारी यांना विचारले असता भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या माध्यमातून लेण्याचा विकास केला जातो़ माहूरच्या पांडव लेणी विकासाबाबतची माहिती आमच्याकडे उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले.