नांदेड- वेगवेगळ्या वक्तव्यामुळे भाजपाच्यापंकजा मुंडे या पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. परंतु पंकजा मुंडे यांचे मानसबंधू आणि रासपाचे नेते महादेव जानकर यांनी मात्र पंकजा यांना सासूरवास सहन करण्याचा सल्ला दिला आहे. पंकजाने सासूरवास सहन करावा, सहन न झाल्यास भावाचा पक्ष आहेच असेही जानकर म्हणाले.
एकप्रकारे जानकर यांनी पंकजा मुंडे यांना भाजपात राहण्याचा आग्रह धरला आहे. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत असलेल्या पंकजा मुंडे यांना पक्षात डावलण्यात येत असल्याची त्यांच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यानंतर त्या भाजपाला सोडचिठ्ठी देतील अशाही चर्चा रंगल्या आहेत. शनिवारी रासपाचे महादेव जानकर हे नांदेडात आले असताना त्यांनी या विषयावर प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, पंकजा या प्रगल्भ असून त्या मोठ्या नेत्या आहेत. तसेच भाजपाच्या सचिव आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही, असे वक्तव्य त्यांनी मंत्रीपदावर असताना केल्याची आठवणही जानकर यांनी करुन दिली. पंकजा ज्या पक्षात आहेत, तिथे त्यांनी सुखी रहावे. प्रसंगी सासूरवास सहन करावा. सासूरवास सहन झालाच नाही तर भावाचा पक्ष आहेच असेही जानकर म्हणाले. अप्रत्यक्षपणे जानकर यांनी आपल्या बहिणीला भाजपातच राहण्याचा सल्ला दिला आहे.