उमरी ( जि. नांदेड) : तालुक्यातील तळेगाव येथील पंजाब नॅशनल बँकेवर दरोड्याचा प्रयत्न झाला. मात्र तिजोरी उघडता आली नसल्याने चोरट्यांचा प्रयत्न सलग दुसऱ्यांदा अयशस्वी झाला . मात्र, बँके बाहेरील पान टपरी व किराणा दुकान फोडून चोरट्यांनी ४५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली.
ही घटना १७ ऑगस्ट रोजी रात्री एक ते दीड वाजताच्या सुमारास घडली. यापूर्वी चार ऑगस्टला मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी बँक फोडण्याचा प्रयत्न केला होता. बँकेबाहेरील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे फोडल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा नवीन कॅमेरे बसविण्यात आले. तळेगाव येथे गावाबाहेरील जि .प. शाळेच्या आवारात एका इमारतीमध्ये पंजाब नॅशनल बँकेची शाखा आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर एक ते दीडच्या सुमारास चोरटे बाईकवरून आले. शाळेच्या गेटवरून चोरटे आवारात घुसले. बँकेतील १० पैकी ४ सीसीटीव्ही कॅमेरे चोरट्यांनी तोडले. बँकेची वीज पुरवठ्याची मुख्य लाइन तोडून टाकली . गॅस कटरने बँकेचे चॅनल तोडून कुलपे काढली. शटर वर वाकवून चोरट्यांनी बँकेत प्रवेश केला. बँकेची तिजोरी मजबूत असल्याकारणाने तिजोरी फोडता आली नाही.
बँकेतील कपाटे उघडून कागदपत्रे अस्ताव्यस्त टाकली तसेच ड्रावर काढून पैशाचा शोध घेतला. मात्र चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. बँक फोडण्याचा प्रयत्न फसल्यानंतर चोरट्यांनी बँके बाहेरील रस्त्यावर असलेल्या बापूराव नाटकर व शेख शरीफ यांच्या पानटपरी व किराणा दुकानात रोख ६ हजार रुपये व किराणामाल पान टपरीतील साहित्य चोरून नेले. सकाळी शाखा व्यवस्थापक अनुज पोजगे , कॅशियर विजय पंडित तसेच कर्मचारी देवणे आदींनी उमरी पोलिसात माहिती दिली. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. बाजूच्या एका शेजारील घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. दुपारी नांदेडहुन श्वानपथक तसेच ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. चोरट्यांचा काहीच तपास लागू शकला नाही. पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम हे करीत आहेत.