नांदेड : कोरोना महामारीमुळे शिक्षणाचा खेळखंडोबा झालेला असताना बहुतांश इंग्रजी शाळांकडून शुल्क वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. या विरोधात पालकांनी ग्यानमाता विद्याविहार शाळेवर मोर्चा काढत शाळा प्रशासनाला धारेवर धरले. बहुतांश शिक्षकांना पगार नाही, इतर खर्चही बंद, मग संपूर्ण शुल्क कशासाठी, असा सवाल पालकांनी उपस्थित केला. नांदेड शहरात असलेल्या बहुतांश इंग्रजी शाळांनी कोरोनाच्या काळातही ऑनलाइन धडे देण्याचे काम केले. त्यात काही शाळांनी केवळ शुल्कवसुली डोळ्यासमोर ठेवून ऑनलाइन व्हिडिओ अपलोड करणे, झूमद्वारे मीटिंग घेऊन विद्यार्थ्यांना धडे दिले; परंतु त्याचा विद्यार्थ्यांना फारसा फायदा झाला नाही. उलट मोबाईल दिल्याने बहुतांश विद्यार्थ्यांच्या डोळ्यावर परिणाम झाला. विद्यार्थ्यांना सोशल मीडियाची सवय लागली. शाळांकडून परीक्षा घेण्यात आल्या; परंतु विद्यार्थ्यांना पुस्तकातून पाहून उत्तर लिहिण्याची मुभा देण्यात आली. हा सर्व प्रकार केवळ शाळांचे शुल्क वसुलीसाठी होता, असा आरोप उपस्थित पालकांनी केला.
नांदेड शहरातील इंग्रजी शाळांकडून कोरोना काळात ऑनलाइन शिकवणी वर्ग घेतले. दरम्यान, काही शाळांनी विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला; परंतु बहुतांश शाळांनी केवळ झूम, व्हाॅटस्ॲपचा वापर करून औपचारिकता पूर्ण केली. त्यात विद्यार्थ्यांना फारसा उपयोग झाला नाही. शाळा बंद असल्याचे कारण देत शिक्षकांचेही पगार दिले नाही. काही शिक्षकांना ऑनलाइनच्या कामासाठी बोलावले. त्यांना केवळ ५० टक्के पगार दिला जात आहे. त्यामुळे इंग्रजी शाळांवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीही नाराज आहेत. शाळेतील संपूर्ण शिक्षकांना पूर्ण पगार दिला जात नाही, मग विद्यार्थ्यांकडून संपूर्ण शुल्क कसे वसूल करता, असा सवालही पालकांनी केला. ऑफलाइन वर्ग सुरू असताना लागणारा खर्च शाळा प्रशासनाला लागत नाही. केवळ ऑनलाइनसाठी मोजके शिक्षक आणि इतर साधनसामग्रीचा खर्च येतो. हा खर्च उचलण्यास आम्हीही तयार असल्याचे पालकांनी सांगितले. जोपर्यंत ऑफलाइन शाळा सुरू होत नाही तोपर्यंत ५० टक्के शुल्क घेऊनच विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे, अशी मागणी पालकांच्या शिष्टमंडळाने शाळा प्रशासनाकडे केली आहे. त्याचबरोबर ऑनलाइन व्हिडिओ, ऑडिओ आणि नेटवर्कच्या अडचणी दूर कराव्यात, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्यावे, आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी शेकडो पालक उपस्थित होते. कोरोनामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या पालकांचा विचार करून शाळा प्रशासनाने योग्य निर्णय न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशाराही पालकांनी दिला आहे.