मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोना महामारीने देशात पाय पसरले. पाहता पाहता वर्ष संपले. मात्र अद्याप कोरोनाचे संकट कमी झाले नाही. दरम्यानच्या काळात कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यामुळे दिलासा मिळाला होता. त्यामुळे शासनाने पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्यास परवानगी दिली होती; मात्र मागील दोन आठवड्यापासून कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. झपाट्याने वाढणारे कोरोनाचे रुग्ण पाहून पुन्हा लॉकडाऊनची वेळ येणार का, अशी चिंता सर्वसामान्यांना पडली आहे. लॉकडाऊनमुळे झालेले नुकसान सहन करून पुन्हा नव्या जोमाने कामाला लागलेली जनता आता लॉकडाऊन लागणार का म्हणून चिंतेत आहे.
चौकट- स्वत:ची काळजी घ्या, आणि आई-बाबाचीही काळजी घ्या
प्रथम तुम्ही स्वताची काळजी घ्या. तसेच आई-वडील, भाऊ, बहीण, शेजाऱ्याचीही काळजी घ्या. वडीलधाऱ्या मंडळीमध्ये कोरोनाची लक्षणे दिसलीच तर त्यांना तातडीने दवाखान्यात घेऊन जा. त्यांची काळजी घेण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. आई-वडिलांना कामानिमित्त बाहेर जावे लागते. बाहेर जाताना ते मास्क लावतात का, बाहेरून आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुतले का, सॅनिटायझर वापरले का हे देखील पाहा. असा सल्ला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आपल्या पत्रातून शालेय विद्यार्थ्यांना दिला आहे.
चाैकट- कोरोनाचे संकट टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी कामानिमित्तच बाहेर पडावे. बाजारातील गर्दी टाळावी, बाहेर जाताना मास्क वापरावे, तसेच वेळोवेळी हात स्वच्छ धुवावेत. ज्यामुळे कोरोना आपल्यापर्यंत येणार नाही. आपल्या कुटुंबाची, मुलांची काळजी म्हणून मास्क, सॅनिटायझर वापरावा. - डॉ.विपीन ईटनकर, जिल्हाधिकारी, नांदेड
चौकट- १.अनेक दिवसानंतर शाळा सुरू झाल्या आहेत. आता शाळेत जाण्यास सुरुवात झाली आणि पुन्हा कोरोना आला. त्यामुळे पुन्हा शाळा बंद होणार का, त्यामुळे सगळ्यांनी मास्क वापरावा. - ओंकार वाघमारे, नांदेड
२. नागरिकांनी नियम पाळले तर लॉकडाऊनची वेळ येणार नाही. त्यासाठी मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे, सॅनिटायझर वापरणे, हात धुणे आदी बाबी आवश्यक आहेत.- श्रेया जोशी, इयत्ता आठवी.
३. बहुतांशी लोक मास्क वापरत नसून नियमांचे पालन करत नाहीत. त्यामुळे आता शालेय विद्यार्थ्यांनीच आपल्या आई-वडिलांना मास्क वापरण्याचे सांगावे. त्यामुळे घराघरात लोक मास्क वापरतील. - प्रथमेश मोहिते.
४.एक वर्ष घरात बसून ऑनलाईन शिक्षण घेतले. आता कुठे शाळा सुरू झाल्या होत्या; मात्र कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पालक मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत. त्यामुळे कोरोनाचे संकट कमी होणे गरजेचे आहे. - दिव्या बुक्तरे, नांदेड.