नांदेड : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहे. यामध्ये जिल्ह्यातील सर्व खाजगी कोचिंग क्लासेस व आठवडी बाजार १२ मार्च ते २१ मार्चदरम्यान बंद राहतील तर सर्व दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेदरम्यान सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली. खाद्यगृह, परमिट रूम, बार सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहतील. त्यांनाही ५० टक्के क्षमतेचे बंधन घालण्यात आले आहे.
जिल्ह्यात १५ मार्चपर्यंत पूर्व नियोजित कार्यक्रमासाठी तहसीलदारांची परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. १६ मार्च ते २१ मार्चपर्यंत मंगल कार्यालय, हॉल्स याठिकाणी लग्नसमारंभ व इतर सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. भाजीमंडई ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. जीम, खेळाची मैदाने हे सुरू राहतील, मात्र कोणत्याही स्पर्धा घेण्यासाठी बंदी राहील.
यापूर्वीच घोषीत झालेल्या सर्व परीक्षा कोरोना नियमावलीचे पालन करून घेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. कोरोनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क, फिजिकल डिस्टनसिग, सॅनिटायझर चा वापर बंधनकारक केला आहे. हे आदेश १२ मार्चच्या मध्यरात्रीपासून २१ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहतील असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी स्पष्ट केले आहे.