नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची रणधुमाळी रंगली आहे. २१ जागांसाठी तब्बल १४३ अर्ज दाखल झाल्याने उमेदवारांची निवड करताना पक्षश्रेष्ठींना इच्छुकांची मनधरणी करावी लागणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेची एकत्रित निवडणूक लढविण्यासाठी बोलणी सुरू आहे, तर दुसरीकडे भाजपनेही खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली रणनीती आखण्यास सुरुवात केल्याने ही निवडणूक चुरशीची होण्याचे संकेत मिळत आहेत.
मागील वेळी राष्ट्रवादीला सर्वाधिक ८, भाजपला ६, काँग्रेस, शिवसेना आणि अपक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली होती. जिल्ह्यात काँग्रेसची ताकद प्रभावी असली तरी अनेकवेळा विरोधकांनी एकत्रित येऊन काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवलेले आहे. मागील निवडणुकीनंतरही काँग्रेस विरोधात महाआघाडी करून भाजप-सेना-राष्ट्रवादीने आलटून पालटून जिल्हा बँकेवर वर्चस्व राखले होते. मात्र, यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रित निवडणुका लढविण्याची तयारी करीत आहेत. त्यामुळे भाजपसमोर मोठे आव्हान उभे आहे. काँग्रेस महाआघाडीत जागांसाठी चर्चा सुरू असली तरीही आघाडीची चिंता इच्छुकांच्या वाढत्या संख्येमुळे वाढली आहे. २१ जागांसाठी तब्बल १४३ अर्ज दाखल झालेले असून, २३ मार्च ही उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने या तिन्ही पक्षांच्या श्रेष्ठींना इच्छुकांची मनधरणी करून महाविकास आघाडीची मोट बांधावी लागणार आहे. दुसरीकडे भाजपकडेही दिग्गज उमेदवारांची फौज आहे. ज्या गटात भाजप कमकुवत आहे, तेथे आघाडीतील नाराज मदतीला येण्याची शक्यताही असल्याने उमेदवारांची निवड करताना महाविकास आघाडीला ताकही फुंकून घ्यावे लागणार आहे.
चौकट------------
मातब्बर उतरले निवडणूक मैदानात
जिल्हा बँकेची ही निवडणूक मातब्बरांच्या उमेदवारीमुळेही यंदा चर्चेत आहे. खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी पुत्र जिल्हा परिषद सदस्य, प्रवीण पाटील यांच्यासह उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे माजी खा. भास्करराव पाटील, माजी मंत्री गंगाधरराव कुंटूरकर, माजी आ. नागेश पाटील आष्टीकर, माजी आ. वसंतराव चव्हाण, बँकेचे माजी अध्यक्ष मोहन पाटील टाकळीकर, दिलीप कंदकुर्ते, गंगाधर राठोड, आदींनी आपले अर्ज दाखल केले आहेत.
चौकट-----
दुसऱ्या पिढीनेही केली दावेदारी
खा. प्रताप पाटील यांच्यासह त्यांचे पुत्र प्रवीण पाटील विद्यमान संचालक आहेत. या दोघांनीही पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. याबरोबरच माजी आ. बापूसाहेब गोरठेकर यांचे चिरंजीव कैलास गोरठेकर मैदानात उतरले आहेत. उमरीतून विधानसभा निवडणूक लढलेले मारोतराव कवळे यांचे सुपुत्र संदीप कवळे यांनीही उमेदवारी दाखल केली आहे, तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरराव बारडकर यांचे पुत्र संजय बारडकर यांनीही अर्ज दाखल केला आहे.