लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नांदेड येथून सध्या हैदराबाद आणि मुंबई विमानसेवा सुरु आहे़ या बरोबरच आठवड्यातून दोन दिवस अमृतसरसाठी विमानाचे उड्डाण होते़ ही सेवा दिल्लीसाठी सुरु करावी अशी मागणी असतानाच, आता नांदेडमध्ये पासपोर्ट कार्यालय सुरु करण्याचा निर्णय झाला आहे़ माजी मुख्यमंत्री खा़अशोकराव चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मानले जात आहे़ येत्या ५ एप्रिलपासून शहरातच पासपोर्ट मिळणार आहे़
नांदेड येथे पासपोर्ट सेवा सुरु करण्याची मागणी मागील काही दिवसांपासून होत होती़ या अनुषंगाने खा़अशोकराव चव्हाण यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना पत्र पाठवून नांदेडमध्ये सदर कार्यालय सुरु करावे अशी विनंती केली होती़ याबरोबरच या मागणीचा पाठपुरावाही त्यांनी केला़ या अनुषंगाने पासपोर्ट कार्यालय नांदेडमध्ये सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ मागील वर्षी राज्यातील सात जिल्ह्यांत ही सेवा सुरु करण्याचे जाहीर करण्यात आले होते़ त्यातील जालना, बीड, अहमदनगर येथे पासपोर्ट सेवा केंद्र सुरु झाले असून नांदेड येथील मुख्य पोस्ट कार्यालय येथे ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे़ अर्जदारांनी पासपोर्टसाठी आॅनलाईन फॉर्म दाखल केल्यानंतर मुलाखतीसाठी दिलेल्या तारखेनुसार नांदेडच्या पासपोर्ट सेवा केंद्रात संबंधित अर्जदारास मूळ कागदपत्रांसह उपस्थित रहावे लागणार आहे़ येथे कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार असून फिंगर प्रिंट फोटो काढण्याचे काम केले जाईल़ त्यानंतर पोलीस पडताळणी होवून अर्जदाराला त्याच्या घरच्या पत्त्यावर पासपोर्ट उपलब्ध होईल़ नांदेड पोस्ट विभागाचे अधीक्षक एस़एम़अली यांनीही सदर पासपोर्ट केंद्र सुरु करण्याच्या सूचना मिळाल्याचे सांगितले़
पोस्टातील दोघांनी घेतले पासपोर्टचे प्रशिक्षणनांदेडमधील पोस्ट कार्यालयात येत्या ५ एप्रिलपासून पासपोर्ट उपलब्ध होणार आहे़ या अनुषंगाने नांदेड पोस्ट कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांनी २१ ते २३ मार्च या कालावधीत पासपोर्ट संबंधीच्या कामाचे पुणे येथे प्रशिक्षण घेतले आहे़ नांदेडमध्ये पासपोर्ट प्राप्त होणार असल्याने शहरवासियांची मोठी गैरसोय दूर होणार आहे़