जिल्ह्यात आजघडीला दररोज पाच हजारांहून अधिक तपासण्या होत आहेत. आता शहरातील प्रभागातही तपासण्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तपासण्यांचा वेग चांगलाच वाढला आहे, परंतु विद्यापीठातील आणि शासकीय रुग्णालयातील तपासणी लॅबमधील अनेक कर्मचारी बाधित झाले आहेत. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा अधिक ताण पडत आहे. परिणामी, सर्वच स्वॅबचे अहवाल वेळेत देणे अशक्य झाले आहे. त्यामुळे शेकडो अहवाल प्रलंबित झाले आहेत. चार दिवसांपूर्वी आरटीपीसीआरचा स्वॅब देऊनही रुग्णांचे अहवाल अद्याप आले नाहीत. त्यामुळे पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, याबाबत रुग्णांना काहीच कळत नाही, तसेच नेमके काय उपचार घ्यायचे, याबाबतही संभ्रमावस्था आहे. विशेष म्हणजे, चार दिवस घरीच उपचार घेतल्याने अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. असे रुग्ण थेट सिटी स्कॅन तपासणी करण्याचा मार्ग अवलंबित आहेत. सिटी स्कॅन तपासणीमध्ये फुप्फुसांमध्ये किती टक्के संसर्ग झाला, हे स्पष्ट होते. त्यावरून उपचारासाठी दाखल होण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.
पॉझिटिव्ह रुग्णाचा मुक्तपणे संचार
अँटिजन तपासणीत पॉझिटिव्ह आल्यानंतर, अनेक जण आरटीपीसीआर तपासणी करीत आहेत, परंतु आरटीपीसीआरचा अहवाल येण्यास दोन ते तीन दिवसांचा वेळ लागत आहेत. त्यामुळे या काळात हे रुग्ण शहरात मुक्त संचार करीत आहेत. त्यांच्यावर कुणाचेही नियंत्रण नसून, त्यामुळे संसर्ग वाढण्याची मात्र शक्यता आहे.