उमरी : नांदेड जिल्ह्यातील उमरी येथील कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना गुरूवार दि. २४ रोजी दुपारी अडीच वाजून गेले तरी जेवणच मिळाले नव्हते. यामुळे भुकेने व्याकूळ झालेले २५ रूग्ण शेवटी वैतागून कोविड सेंटरच्या बाहेर येऊन थांबले. बिल रोखल्यामुळे कंत्राटदाराने जेवणाचे डब्बे बंद केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
तहसीलदार, नायब तहसीलदार, डॉक्टर यांना रूग्ण वारंवार यासंदर्भात फोन करत होते. परंतू त्यांना कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. यासंदर्भात तहसीलदार माधव बोथीकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, जेवण पुरविणाऱ्या कंत्राटदारास नव्वद हजारांचे बिल दिले. मात्र तो आतापर्यंतचे संपूर्ण दोन लाखांचे बिल देण्यासाठी अडून बसला असून गुरूवारी त्याने कसलीही माहिती न देता अचानक डबे देणे बंद केले. याबाबत आम्ही लवकरच संबंधितांविरुद्ध कारवाई करू, असेही बोथीकर यांनी सांगितले. पर्यायी व्यवस्था म्हणून कोविड सेंटर मधील उपाशी असलेल्या सर्व रुग्णांना दुपारी तीनच्या सुमारास फळे व खिचडी देण्यात आल्याची माहिती नायब तहसीलदार राजेश लांडगे यांनी दिली.