माळकौठा येथे शिवजयंती
मुदखेड - माळकौठा येथे यावेळी साध्या पद्धतीने शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कीर्तन आणि व्याख्यानाचा कार्यक्रम यावेळी रद्द करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी एकत्र येवून अभिवादन करून शिवजयंती साजरी करण्यात आली.
लॉकडाऊनमुळे बाजारात गर्दी
हदगाव - नांदेड जिल्ह्यात २४मार्च ते ५ एप्रिल या दरम्यान लॉकडाऊन लागणार असल्याने रोज लागणाऱ्या वस्तूसाठी नागरिक गर्दी करत आहेत. तसेच महत्त्वाची कामेही उरकून घेत आहेत. कामे उरकून घेतली की ११ दिवस शेतात काम करता येईल असे नियोजन अनेकांनी केले. या काळात ज्यांच्या घरी लग्न कार्य आहेत अशांची मात्र पंचायत झाली.
ट्रॅक्टर जळून खाक
माहूर - वादळी वारा, पावसामुळे मौजे नेर येथे उभ्या ट्रॅक्टरवर वीज कोसळून मोठे नुकसान झाल्याची घटना घडली. एम.एच.२६-व्ही.८०१२ या क्रमांकाचा ट्रॅक्टर नेर येथील माधवराव जगताप यांच्या शेतात होता. २० मार्चच्या रात्री वादळी वारा व पाऊस झाला. यात उभ्या ट्रॅक्टरवर वीज पडून ट्रॅक्टरचा अर्धा भाग व टायर जळून खाक झाले. यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले.
देशमुख यांची चौकशी करा
माहूर - राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपाच्या वतीने एका निवेदनात करण्यात आली. निवेदनावर अविनाश भोयर, कुलदीप घोडेकर, सागर महामुने, संजय पेंदोर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
अखंड हरिनाम सप्ताह
कामठा बु. - येथे कोरोनाचे नियम पाळून अखंड हरिनाम सप्ताह साजरा करण्यात आला. यामध्ये काकडा, हरिपाठ, पारायण, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम झाले. हभप अच्युत महाराज दस्तापूरकर यांचे काल्याचे कीर्तन झाले. सप्ताहदरम्यान संयोजकांनी मास्क व सॅनिटायझरची व्यवस्था केली होती.
आरोग्य शिबीर घ्या
किनवट - किनवट तालुक्यातील लिंगी तांडा येथे विविध आजार फैलावले आहेत. आरोग्य विभागाने येथे आरोग्य शिबीर घ्यावे अशी मागणी प्रहारचे तालुकाध्यक्ष मधुकर शेंडे यांनी आरोग्य विभागाकडे केले. सध्या ताप, सर्दी, टायफायड, मलेरियासारखे आजार उद्भवत आहेत अशी तक्रार लोकांची आहे.
बहुजन शिक्षकांकडून स्वागत
मुदखेड - राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीसपदी डी.बी. जांभरुणकर यांची निवड झाली. या निवडीचे बहुजन शिक्षक महासंघाकडून स्वागत करण्यात आले. यावेळी प्रा.श्रीपती पवार, रामदास पाटील, प्रा.नागनाथ खेळगे, देवीदासराव बस्वदे, गजानन पांपटवार, सूर्यकांत कावळे आदी उपस्थित होते.
तीन विद्यार्थी पात्र
भोकर - किनी येथील जिल्हा परिषद हायस्कूलचे तीन विद्यार्थी सैनिकी स्कूलसाठी पात्र ठरले आहेत. त्यामध्ये अक्षरा मुळे, सचिदानंद मुसकुटवार, वैष्णवी सुरकुुंटवार यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांची मुख्याध्यापक गरजे, सहशिक्षक मुळे यांनी स्वागत केले.
कोविड केअर सेंटर कार्यान्वित
उमरी - उमरी येथे कोविड केअर सेंटर कार्यान्वित झाल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ.शंकर चव्हाण यांनी दिली. सोमवारी दुपारी तहसीलदार माधवराव बोथीकर, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी या सेंटरला भेट देवून सर्व सोयींची पाहणी केली.