"पाच लाख देऊन विषय संपणार नाही, 'महाराष्ट्र भूषण'कार्यक्रमाची न्यायालयीन चौकशी व्हावी"

By श्रीनिवास भोसले | Published: April 25, 2023 12:25 PM2023-04-25T12:25:48+5:302023-04-25T12:35:50+5:30

राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा

Paying 5 lakh will not end the matter, 'Maharashtra Bhushan' program should be investigated by court: Ashokrao Chavan | "पाच लाख देऊन विषय संपणार नाही, 'महाराष्ट्र भूषण'कार्यक्रमाची न्यायालयीन चौकशी व्हावी"

"पाच लाख देऊन विषय संपणार नाही, 'महाराष्ट्र भूषण'कार्यक्रमाची न्यायालयीन चौकशी व्हावी"

googlenewsNext

नांदेड : महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळा ऐन उन्हाळ्यात आयोजित करून निष्पाप १४ लोकांचा बळी घेणाऱ्या राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. तसेच या कार्यक्रमाची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केली. नांदेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री डी. पी. सावंत, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, प्रवक्ता संतोष पांडागळे, मुतेजीब यांची प्रमुख उपस्थिती होती.

पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सोहळा योग्यच होता, आप्पासाहेब यांना पुरस्कार दिल्याने या पुरस्काराची उंची वाढली. परंतु, हा कार्यक्रम चुकीच्या पद्धतीने घेऊन श्री सदस्यांना झालेला नाहक त्रास आणि उष्माघाताने १४ लोकांचा घेतलेला बळी तसेच शेकडो लोक आजारी पडून रुग्णालयात भरती झाले. त्याची जबाबदारी कोण घेणार? आयोजक म्हणून नैतिक जबाबदारी घेऊन राज्य सरकारने पुढे येणे गरजेचे होते. परंतु, यावर बोलायला कोणीही तयार नाही, असे चव्हाण म्हणाले.

ऐन उन्हाळ्यात एवढा मोठा जनसमुदाय एकत्रित आणण्याची गरज होती का? या कार्यक्रमातून सरकारला शक्तिप्रदर्शन करायचे होते का? असे विविध प्रश्न उपस्थित होतात, असे चव्हाण म्हणाले. पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यामुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन सरकारने नियोजन करणे गरजेचे होते. परंतु, प्यायला पाणी कमी पडल्याने अनेकांना जागोजागी भोवळ येत होती. अनेकजण रात्रीपासूनच कार्यक्रमस्थळी पोहोचले होते. त्यांना भोजनाची व्यवस्था केली गेली नाही. सलग सहा-आठ तास उन्हात बसणाऱ्यांना साधे पाणी मिळाले नाही. परिणामी अनेकांना उष्माघात झाला आणि त्यातच त्यांचा जीव गेला. ज्यावेळी श्री सदस्यांना चक्कर, भाेवळ येत होती, त्यावेळी कार्यक्रम सुरूच होता. रुग्णवाहिकेतून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. हा सर्व प्रकार नियोजन नसल्यानेच झाला. त्यामुळे या सर्व कार्यक्रमाची न्यायालयीन चौकशी करावी. तसेच एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावून त्यावर चर्चा करावी, अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पाच लाख देऊन विषय संपणार नाही...
या कार्यक्रमावर तब्बल १३ कोटींचा खर्च करण्यात आला. प्रमुख मान्यवर वातानुकूलित कक्षात आणि श्री सदस्य उन्हात होते, ही शोकांतिका आहे. मृतांच्या वारसांना पाच लाख रुपये देऊन हा विषय संपणारा नाही, असेही चव्हाण म्हणाले.

Web Title: Paying 5 lakh will not end the matter, 'Maharashtra Bhushan' program should be investigated by court: Ashokrao Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.