नांदेड : हदगाव तालुक्यातील आष्टी शाळकरी मुलाच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा त्यासह शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या निरपराध तरुणांना सोडून देण्याची मागणी बुधवारी शांतता समितीच्या बैठकीत करण्यात आली. यावेळी आमदारांसह नगरसेवक तसेच समाजाच्या प्रतिनिधींनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दात संताप व्यक्त केला़ पोलीस अधीक्षकांची तातडीने बदली करा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयात बचतभवन येथे बुधवारी सायंकाळी झालेली शांतता समितीची बैठक वादळी ठरली़ आ़डी़पी़सावंत, आ़हेमंत पाटील यांच्यासह महापौर शीलाताई भवरे, जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई जवळगावकर, भदंत पैय्याबोधी आदींनी जिल्हाधिकार्यांसमोर प्रशासनाला धारेवर धरले़ या बैठकीत पोलिसांनी अतिरेकी बळाचा वापर करत महिला, मुले, वृद्धांना मारहाण केल्याच्या घटनेचा निषेध केला. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा, मात्र घरातील चिमुकली मुले, महिला, वृद्धांना गुन्हेगाराप्रमाणे मारहाण कशासाठी, असा संतप्त सवालही उपस्थित करण्यात आला. यावेळी रमेश सोनाळे, डॉ. एन. के. सरोदे, प्रफुल्ल सावंत, सुभाष रायबोले, किशोर भवरे, सुखदेव चिखलीकर, प्रशांत इंगोले यांनी आपल्या भावना मांडताना पोलिसांनी समाजात शांतता नांदण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असताना पोलीसच शांतता बिघडवित असल्याचा आरोप केला़ बुधवारी शहरात पोलिसांचा दहशतवादच होता अशी प्रतिक्रियाही यावेळी उमटली. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना यांची तात्काळ बदली करण्याची मागणी
यावेळी करण्यात आली़ भदंत पंय्याबोधी म्हणाले, समाजातील अप्रिय घटना टाळण्यासाठी आमच्याकडून नेहमीच सहकार्य होते़ मात्र पोलिसांकडून अतिरेकी बळाचा झालेला वापर ही बाब निंदणीय असल्याचे सांगून पोलीस अधीक्षकांवर कारवाईची मागणी त्यांनी केली. महापौर शीलाताई भवरे, सुरेश गायकवाड यांनी पोलीस प्रशासनाने वेळीच खबरदारी न घेतल्याने शहरात ही परिस्थिती उद्भवल्याचे सांगितले. मंगळवारीच पत्र देऊन शांतता समितीची बैठक घेण्याची मागणी आपण केली होती. मात्र त्याकडे पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप भवरे यांनी केला़
आष्टी (ता. हदगाव) येथील निष्पाप शाळकरी मुलाचा मृत्यू ही बाबही अत्यंत संतापजनक तसेच दुखद आहे. आष्टीमध्येही पोलिसांनी पाशवी बळाचा वापर केला. राज्य राखीव दलाच्या तुकडीतील जवानाने केलेल्या मारहाणीत योगेश जाधव या १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून या प्रकरणी संबधितावर कारवाईची मागणी करण्यात आली़ बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, तहसीलदार किरण अंबेकर, अभिजीत फस्के यांचीही उपस्थिती होती.
पोलीस-जनतेमध्ये दुवा राहिला नसल्याची व्यक्त केली खंतभीमा कोरेगाव येथील घटना ही निषेधार्यच आहे. त्याचे पडसाद अपेक्षित होते. शहरात शांतता टिकून ठेवण्यासाठी पोलीस आणि जनतेमध्ये दुवा असला पाहिजे मात्र तो राहिला नसल्याचे आ. हेमंत पाटील यांनी सांगितले. सामान्य जनतेशीच नव्हे तर माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीशीही पोलिसांचा संवाद कमी असल्याचे ते म्हणाले. नांदेडकर हे चांगल्या अधिकार्यांचा नेहमीच सन्मान करतात, अशी टिप्पणीही त्यांनी केली़
विद्यार्थ्याचा मृत्यू दुर्देवी; कायदेशीर बाबी तपासू-जिल्हाधिकारीजिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जिल्ह्यात घडलेल्या घटना दुर्दैवी असल्याचे सांगितले. पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या बाबतही कायदेशीर बाब विचारात घेतली जाईल असे ते म्हणाले. नागरिकांनी शांततेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. तत्पूर्वी अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी शहरात पोलिसांनी शांतता ठेवण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता असे सांगितले. राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या सध्या शहरात आहेत. आणखी एक तुकडी येत असल्याचे सांगितले. कायद्याचे पालन न करणार्यावर कारवाई होईल असेही ते म्हणाले.
पोलिसांचे कोम्बिंग आॅपरेशन निंदनीय- आ.सावंतभीमा कोरेगाव घटनेचे पडसाद नांदेडमध्ये उमटतील ही बाब अपेक्षित असतानाही आवश्यक तो बंदोबस्त ठेवण्यात आला नाही. उलट एका घटनेनंतर पोलिसांनी थेट आंबेडकरनगर, जयभीमनगर, जनता कॉलनी येथे घरात शिरुन महिला, मुले, वृद्धांना मारहाण केली. घरात तोडफोड केली. पोलिसांनी केलेले हे कोम्बिंग आॅपरेशन निंदनीय असल्याचे सांगितले. लोकप्रतिनिधी व पोलिसांमध्ये दुरावा वाढत आहे. पोलीसच आता बघून घेऊची भाषा करीत आहेत. सहा वर्षाच्या अजय किशनराव पाईकराव, संगीता संजय खंडागळे, लक्ष्मी सिद्धार्थ जावळे, पृथ्वीराज रमेश काळे या निष्पाप नागरिकांना घरातून बाहेर काढून मारहाण करणे ही कोणती मर्दांनगी असल्याच सवाल आ. सावंत यांनी केला. आष्टी येथील प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.