जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी आंबुलगेकर, शिक्षण सभापती संजय बेळगे, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांची भेट घेऊन प्रलंबित मागण्यांचे निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर यांनी शिक्षणाधिकारी दिग्रसकर यांना शिक्षकांचे पगार एक तारखेला करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा व सर्व प्रलंबित संचिका तत्काळ माझ्याकडे पाठवा, अशा सूचना दिल्या. शिक्षण सभापती संजय बेळगे यानी शिक्षण विभागातील लेखापाल अशोक वाघमारे यांना पगार वेळेवर करण्यासाठी आदेशीत केले. जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी आंबुलगेकर यांनीही सर्व समस्यांवर सविस्तर चर्चा करून समस्या सोडविण्यासाठी संघटनेची प्रशासनासोबत बैठक लावण्यात येईल, असे सांगितले.
संघटनेने जिल्ह्यातील शिक्षकांचे पगार १ तारखेला करण्यासाठी तत्काळ सीएमपी प्रणालीची अंमलबजावणी करण्यात यावी, भनिनि स्लीपमधे झालेल्या चुकांची दुरूस्ती करून तत्काळ नवीन दुरूस्त केलेल्या भनिनि स्लीपचे वितरण करावे, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुखांची पदे अभावितपणे भरावीत. तसेच शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी जिल्हा परिषद हायस्कूलमधील अराजपत्रीत मुख्याध्यापकांची रिक्त पदे तत्काळ भरावीत, मुख्याध्यापकांच्या रखडलेल्या पदोन्नती तत्काळ कराव्यात, जिल्ह्यातील पात्र शिक्षकांना प्रा. पदवीधरची वेतनश्रेणी लागू करावी, निमशिक्षकांच्या वेतनश्रेणीचा प्रश्न निकाली काढावा आदी मागण्यांचे निवेदन दिले.
यावेळी विभागीय अध्यक्ष संजय कोठाळे, जिल्हाध्यक्ष दत्तप्रसाद पांडागळे, महिला जिल्हाध्यक्षा माधवी पांचाळ यांनी समस्या मांडल्या. २८ फेब्रुवारीपर्यंत प्रश्न निकाली न काढल्यास १ मार्चला प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर ‘ढोल बजाओ’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिक्षक परिषदेकडून देण्यात आला. शिष्टमंडळात राज्य कार्याध्यक्ष मधुकरराव उन्हाळे, शिक्षकनेते विठ्ठलराव ताकबिडे, जिल्हा सल्लागार शंकर पडगीलवार, कोषाध्यक्ष बालाजी पांपटवार, प्रवक्ते राजेंद्र पाटील, संपर्कप्रमुख व्यंकट गंदपवाड आदी सहभागी होते.