नांदेड : जिल्ह्यातील देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांचा विजय हा जनतेचा, महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचा विजय आहे. एकप्रकारे या विजयातून देगलूर-बिलोली तालुक्यातील जनतेने दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांना वाहिलेली श्रद्धांजली हाेय, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिली.
मंगळवारी सायंकाळी पोटनिवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर अशोकराव चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यातीलच नव्हे, तर देशातील जनतेला भाजपचे तोडा-फोडीचे राजकारण लक्षात आले आहे. जनतेला सुडाचे नाही, तर विकासाचे राजकारण हवे आहे. देशात महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, राजस्थान आदी राज्यांत झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालातून जनतेने हे दाखवून दिले आहे. देगलूर विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही विकासाचा अजेंडा मांडला आणि मतदारांनी आम्हाला भक्कम साथ दिली. यातूनच राज्यात असलेली महाविकास आघाडीही भक्कम असल्याचे जनकौलातून स्पष्ट झाल्याचे मत अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले. ही निवडणूक दिवंगत रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाने लागली होती. त्यामुळे याजागी अंतापूरकर कुटुंबियांनाच संधी देण्याचा निर्णय काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी घेतला. त्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भूमिकाही महत्त्वपूर्ण राहिली, असे चव्हाण यांनी सांगितले. त्याचबरोबर महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि नेत्यांनी दिलेली साथ विजयश्री खेचून आणू शकली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पाठबळ दिले. सरकार पाडण्याचे मनसुबे पाहणाऱ्यांना जनकौलाने ही चपराक दिल्याचे अशोकराव चव्हाण म्हणाले. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करू, असेही चव्हाण यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांकडून चव्हाणांचे अभिनंदनदेगलूर विधानसभेच्या निकालाबाबत माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन केला होता. त्यांनी विजयाबद्दल अभिनंदन केले, मीही त्यांचे आभार मानले. तसेच दादर नगर हवेलीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या विजयाबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केल्याचे चव्हाण यांनी सांगितले.