नांदेडकर हुशार; मोदींना फसले नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 12:44 AM2019-04-08T00:44:16+5:302019-04-08T00:47:10+5:30
२०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी जनतेला अनेक स्वप्ने दाखविली. या आश्वासनांना देशातील जनता भुलली. मात्र पाच वर्षांचा भाजपाचा कार्यकाळ पाहिल्यानंतर नांदेडमधील जनताच हुशार होती. जनतेने भाजपाच्या भाषणबाजीवर न भुलता अशोकरावांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला.
नांदेड : २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी जनतेला अनेक स्वप्ने दाखविली. या आश्वासनांना देशातील जनता भुलली. मात्र पाच वर्षांचा भाजपाचा कार्यकाळ पाहिल्यानंतर नांदेडमधील जनताच हुशार होती. जनतेने भाजपाच्या भाषणबाजीवर न भुलता अशोकरावांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. आता तर नरेंद्र मोदींचा पाच वर्षांचा अपयशी कारभार आपल्यासमोर आहे. त्यामुळे नांदेडमधून पुन्हा अशोकराव चव्हाण मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
रविवारी रात्री वाजेगाव येथे काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीच्या वतीने आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. मंचावर लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार खा. अशोकराव चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी जिल्हा परिषद सदस्य मनोहर शिंदे यांनी दक्षिणमधून भरघोस मताधिक्य देवू, असा शब्द दिला तर मुस्ताक काझी यांनी ईदगाह मैदानासाठी ३५ लाख रुपये आणि वाजेगावचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी ८ कोटींचा निधी अशोकराव चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळेच मिळाल्याचे स्पष्ट केले.
जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात शिवसेना-भाजपावर सडकून टीका केली. वर्धा, गोंदियात मोदींच्या सभांना प्रतिसाद मिळाला नाही. नांदेडमध्ये मोदींच्या चेहऱ्यावर उत्साह नव्हता. भाषणातही त्यांनी टीकेपलीकडे काही सांगितले नाही. पंतप्रधान म्हणून स्वत:च्या कार्यक्रमाबद्दल बोलायला हवे. शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांसह राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय धोरण मांडायला हवे. मात्र पाच वर्षांत काहीच केलेले नसल्याने पंतप्रधान आता पातळी सोडून टीका करीत फिरत असल्याचे पाटील यांनी सांगितले. पाच वर्षांत देशवासीयांची फसवणूक केल्यानंतर आता नरेंद्र मोदी हे जवानामागे दडत असल्याचे सांगत पुलवामा येथे झालेल्या स्फोटाला जबाबदार कोण? अडीचशे किलो आरडीएक्स तिथपर्यंत आले कसे? याची उत्तरे आता भाजपानेच द्यायला हवीत. काँग्रेसच्या काळातही सर्जीकल स्ट्राईक झाले मात्र त्याचा आम्ही कधी गवगवा केला नसल्याचे सांगत सर्वाधिक दहशतवादी हल्ले मोदींच्याच काळात झाले. याबरोबर शेतकरी आत्महत्यांच्या घटनाही याच देवेंद्र आणि नरेंद्रच्या काळात झाल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले. अशोकराव चव्हाण यांनी आपल्या भाषणात वाजेगावमधील वीटभट्ट्या आपण स्वत: पाठपुरावा करुन पुन्हा सुरू केल्याचे सांगितले. उद्योग बंद करुन येथील लोकांची रोजीरोटी हिसकावू नका, असेही ते म्हणाले.
वंचित आघाडी स्पॉन्सर्ड
महाराष्ट्रात दलित, अल्पसंख्याक, ओबीसी आपल्याला मते देणार नाहीत याची जाणीव भाजपाला झाली होती. त्यामुळे त्यांनीच मतविभाजन करण्यासाठी वंचित आघाडी स्पॉन्सर्ड केल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला. जागा वाटपासाठी चर्चा सुरू असताना दुसरीकडे उमेदवारी जाहीर होत होती. यावरुनच हे स्पष्ट होत असल्याचे सांगत वंचित आघाडीच्या नादी लागून स्वत:ची फसगत करु नका, तर भाजपाच्या पराभवासाठी काँग्रेस आघाडीला मते द्या, असे आवाहन पाटील यांनी केले.
कै. शंकररावांमुळेच मिळाले या भागाला पाणी
वाजेगाव कायम काँग्रेसच्या पाठीशी राहिले आहे. मी तुमच्याच गावचा असल्याचे सांगत शंकरराव मतदानासाठी धनेगावला यायचे, या आठवणींना उजाळा देत शंकररावांमुळेच या भागाला पाणी मिळाल्याचे अशोकराव चव्हाण यांनी सांगितले. नांदेडमधून काँग्रेसचा विजय पक्का असल्याची ग्वाही देत ७० टक्के मतदान भाजपाविरोधी असताना केवळ मतविभाजनामुळे मागीलवेळी त्यांची सत्ता आली होती. मात्र, यावेळी जनता भूलणार नाही. भाजपाला धडा शिकवेल, असे ते म्हणाले.