विमान, हेलिकॉप्टरमध्ये फिरून लोकांचे दुःख समजणार नाही, राहुल गांधी यांचा नांदेडच्या सभेत कडाडून हल्लाबाेल
By शिवराज बिचेवार | Published: November 11, 2022 05:55 AM2022-11-11T05:55:49+5:302022-11-11T05:55:59+5:30
विमान किंवा हेलिकॉप्टरमध्ये फिरून लोकांचे दुःख समजणार नाही. आजघडीला देशातील सर्व पैसा तीन ते चार उद्योगपतींच्या घशात घालण्यात येत आहे.
नांदेड :
विमान किंवा हेलिकॉप्टरमध्ये फिरून लोकांचे दुःख समजणार नाही. आजघडीला देशातील सर्व पैसा तीन ते चार उद्योगपतींच्या घशात घालण्यात येत आहे. त्यामुळे शाळांमध्ये संगणकसुद्धा नाहीत. इकडे पंपचे बटन दाबले की तिकडे तुमच्या खिशातील पैसा थेट उद्योगपतींकडे जातो, अशा शब्दांत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात झालेल्या पहिल्या जाहीर सभेत हल्लाबोल केला.
भारत जोडो यात्रा गुरुवारी नांदेड शहरात दाखल झाली. नवीन मोंढा मैदानावर राज्यातील पहिलीच जाहीर सभा घेण्यात आली. सभेला हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी राहुल गांधी म्हणाले, नोटबंदीनंतर चुकीची जीएसटी लावण्यात आली. स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच शेतमालावर जीएसटी भरावी लागत आहे. शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळत नाहीत. मालाला एमएसपी मिळत नाही, छोटे व्यापारी हैराण आहेत, तरुणांना नोकरी मिळत नाही. त्यामुळे त्यांचे दुःख जाणून घेण्यासाठी आम्ही पायी चालत भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. आता आम्हाला कोणतीही शक्ती रोखू शकणार नाही. काश्मीरला जाऊन आम्ही तिरंगा फडकविणार आहोत. यावेळी माजी मुख्यमंत्री अशेाक चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आपले विचार मांडले.
आता देशात वेगळेच तपस्वी
हा देश तपस्वींचा आहे. हा देश तपस्वींपुढेच आपली मान झुकवितो. देशातील शेतकरी, मजूर, व्यापारी हेही एकप्रकारे तपस्याच करीत आहेत. परंतु त्यांच्या कर्माची फळे त्यांना मिळत नाहीत. कारण आता वेगळ्याच पद्धतीचे तपस्वी या देशात आहेत. ते आता सर्वांना दिसत आहेत.
- राहुल गांधी
...अन् मुलांना टॅब दाखविला
सॉफ्टवेअर इंजिनीअर बनण्याचे ध्येय असलेल्या विद्यार्थ्यांना जेव्हा राहुल गांधी यांनी कॉम्प्युटर बघितले का? असे विचारले, तेव्हा विद्यार्थ्यांनी नाही, असे सांगताच रस्त्याच्या एका कठड्यावर बसून राहुल गांधींनी या विद्यार्थ्यांना स्वत:जवळचा टॅब दाखविला. भारत जोडो यात्रा नांदेड शहराकडे येत असताना गुरुवारी हा प्रसंग घडला.
आम्हाला शिव्या दिल्याशिवाय पोटच भरत नाही : खरगे
- भाजप आणि आरएसएस आम्हाला विचारत आहेत की, सत्तर वर्षात तुम्ही काय केले? अहो आम्हीच सगळे केले. आम्ही जे केले ते आता तुम्ही विकून खात आहेत.
- पब्लिक सेक्टर विकण्याचा सपाटाच सुरू आहे. फोटोग्राफी आणि जुमलेबाजी करुन देशाची दिशाभूल करण्यात येत आहे. सकाळी उठल्यानंतर देवाची पूजा करीत नाहीत, परंतु आम्हाला शिव्या घालतात.
- आम्हाला शिव्या घातल्याशिवाय यांचे पोटच भरत नाही. काँग्रेसने संविधान धोक्यात आणल्याची ओरड करतात. असे असते तर तुम्ही पंतप्रधान झालेच नसते. दरवर्षी दोन कोटी रोजगार, १५ लाख रुपये कुठे गेले? असा सवाल काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.