गॅस सिलेंडरचा स्फोट
हदगाव - हदगाव तालुक्यातील येवली येथे गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन घर जळाल्याची घटना सोमवारी घडली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घरातील ३० क्विंटल कापूस जळून खाक झाला. सोमवारी घरात असलेल्या सुरेखा भुसे यांनी गॅस सिलेंडर चालू करताच गॅसचा स्फोट होऊन गॅसचे झाकन पत्र्याला छिद्रे पडून जवळपास ८०० मीटर दूरवर जाऊन पडले. आगीत संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. ग्रामसेवक ए.के. पंडित, सरपंच बसवंत मेटेवाड, दिगंबर मुंगल, शेषराव वाकोडे, सटवाजी दूधकावडे, रमेश वाठोरे आदींनी घटनास्थळी भेट दिली.
ऑटो घेण्यासाठी विवाहितेचा छळ
नायगाव - नायगाव तालुक्यातील बेळगाव येथील ३० वर्षीय विवाहितेचा ऑटोरिक्षा घेण्यासाठी माहेराहून १ लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून छळ केल्याची घटना घडली. तुला स्वयंपाक येत नाही, दिसायला चांगली नाही असे म्हणूनही आरोपी विवाहितेचा छळ करीत होते. याशिवाय तिला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. कुंटूर पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे.
गायकवाड सन्मानित
हदगाव - तामसा येथील भूमिपुत्र तथा उमरखेड येथील सामाजिक कार्यकर्ते शेषराव गायकवाड यांना भाऊसाहेब माने समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी आ.नामदेव ससाणे, माजी आ. विजय खडसे, बीडीओ प्रवीण वानखेडे आदी उपस्थित होते.
पिंचोडी येथे कबड्डी स्पर्धा
हिमायतनगर - तालुक्यातील पिंचोडी येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त कबड्डी स्पर्धा घेण्यात आल्या. तत्पूर्वी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेची गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.
सुमीत मामीलवाड चमकला
बाऱ्हाळी - येथील सुमीत सुधाकर मामीलवाड याने जेईई परीक्षेत स्पृहणीय यश मिळविले. त्याची एनआयटी प्रयागराज उत्तरप्रदेश येथे निवड झाली आहे. सुमीत हा सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक रामराव रामोड यांचा नातू तर महावितरणचे इरन्ना मामीलवाड यांचा पुतण्या आहे. त्याचे वडील बाऱ्हाळी येथील शांतीनिकेतन विद्यालयाचे मुख्याध्यापक आहेत.
बरडशेवाळा शाळेला भेट
हदगाव - जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रवींद्र अंबेकर यांनी बरडशेवाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देऊन पाहणी केली. यावेळी शाळेच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पवार, शालेय विस्तार अधिकारी पाटील, केंद्रप्रमुख शेख, गोडघासे, मुख्याध्यापक एम.एस. सूर्यवंशी, शिक्षक एम.एन. सोनटक्के, एम.व्ही. गीरबीडे, एस.एच.शेख आदी उपस्थित होते.
जगनाडे महाराज जयंती
हदगाव - तालुक्यातील तामसा येथील तेली समाजाकडून संत जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने ग्रामपंचायतसह शासकीय कार्यालयांना महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली. यावेळी सुरेश देशमुख, संतोष ठमके, चंदू देशमुख, दीपक देशमुख, सचिन शिंदे, धोंडू देशमुख, बाबाराव बच्चेवार, विशाल ठमके, राजू देशमुख आदी उपस्थित होते.
नामफलकाचे अनावरण
उमरी - तालुक्यातील सिंधी येथील शेतकरी संघटनेच्या नामफलकाचे अनावरण गुणवंत पाटील हंगरगेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे, धोंडीबा पवार, आर.पी.कदम, माधवराव पाटील, दत्ता पाटील आदी उपस्थित होते.
अध्यक्षपदी मल्लू
देगलूर - देगलूर तालुक्यातील शहापूर येथील विठ्ठल रुक्माई मंदिराच्या अध्यक्षपदी मल्लू गुरुजी यल्लावार यांची गावकऱ्यांनी निवड केली. यावेळी शिवाजी कनकट्टे, मल्लनरेड्डी चिंतलवाड, मल्लारेड्डी पाल्लावार, गंगारेड्डीकोडगीरे, बाबू पाटील आदी उपस्थित होते.