लसीकरणाची तयारी
बारड - येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकरणासाठी कर्मचाऱ्यांची पूर्व प्राथमिक रंगीत तालीम घेण्यात आली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.किरण देशमुख, डॉ.वाघमारे, डॉ.चव्हाण, डॉ.के.एच.कदम, डॉ.एस.डी. सुकळीकर, डाॅ.यु.एस.पांचाळ, डॉ.अतुल कदम, डॉ.किरण देशमुख, डॉ.अरुणकुमार राठोड, डॉ.अतुल कांबळे आदी उपस्थित होते.
देशपांडे सेवानिवृत्त
मुदखेड - महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक रेणुकादास देशपांडे सेवानिवृत्त झाल्याने त्यांना एका कार्यक्रमात निरोप देण्यात आला. यावेळी पर्यवेक्षक प्रमोद मुन, उपमुख्याध्यापक किरण देशपांडे, उपप्राचार्य प्रल्हाद हिंगोले, प्रा.रमेश जाधव, प्रदीप बाविस्कर, बाबूराव नाईक, प्रा. दत्तात्रय मंगनाळे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा. प्रेमकुमार कौशल्य यांनी, तर आभार हौसाजी गाडे यांनी मानले.
निवडणुकीच्या प्रचाराला वेग
देगलूर - तालुक्यातील विविध ठिकाणच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. १५ जानेवारी रोजी मतदान, तर १८ ला मतमोजणी होणार आहे.
पोलीस स्थापना दिन
कंधार - उस्माननगर येथील पोलीस ठाण्यात पोलीस स्थापना दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कांबळे, तर सपोनि शिवचंद्र जमदाडे, फौजदार पी.बी. थोरे यांची यावेळी उपस्थिती होती. याप्रसंगी विठ्ठल ताटे, धम्मदीप चावरे, देवीदास डांगे, प्रदीप देशमुख, गणेश लोखंडे, माणिक भिसे, सूर्यकांत मालीपाटील, अमजद पठाण, लक्ष्मण कांबळे, सुरेश बाश्टे आदी उपस्थित होते.
गावंडे यांची फेरनियुक्ती
बिलोली - वंचित बहुजन आघाडीच्या बिलोली तालुकाध्यक्षपदी धम्मदीप गावंडे यांची फेरनिवड झाली. या निवडीचे नायगाव, बिलोली व अंजनी येथे स्वागत करण्यात आले. या सर्व कार्यक्रमांना कपिल डुमणे व अन्य उपस्थित होते. गावंडे यांना डॉ. बाळासाहेब आंबेडकर यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देण्यात आले.
तरुणाची आत्महत्या
किनवट - तालुक्यातील वागदरी येथील दत्ता श्यामराव वाघमारे (वय ४८) यांनी १० जानेवारी रोजी घरात विषारी औषध प्राशन केले. त्यांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आत्महत्येचे नेमके कारण कळले नाही. ग्रामीण ठाण्याचे डब्ल्यू.के. कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. सहायक फाैजदार शेख तपास करीत आहेत.
प्रदेशाध्यक्षपदी श्रीरामवार
उमरी - मानवाधिकार सामाजिक न्याय नागरिक मंचच्या प्रदेशाध्यक्षपदी उमरी येथील दादासाहेब श्रीरामवार यांची निवड झाली. या निवडीचे अनेकांनी स्वागत केले आहे. मागील अनेक दिवसांपासून श्रीरामवार हे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.
पूर्वीच्या वेळेला बस सुरू ठेवा
नायगाव - नांदेडहून बरबडा-इज्जतगाव या मार्गावर दोन ते तीन वेळा बस धावत असल्या तरीही पूर्वीच्या वेळेला एकही बस नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रवाशांना नाइलाजाने अवैध वाहतुकीच्या माध्यमातून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाने बरबडा, इज्जतगावसाठी पूर्वीच्या वेळेला बस सुरू ठेवावी, अशी मागणी होत आहे.
रायवाडी बिनविरोध
लोहा - तालुक्यातील रायवाडी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध पार पडली. त्यामुळे सरपंच गोविंदराव विभुते यांचा माजी नगराध्यक्ष कल्याणराव सूर्यवंशी यांनी सत्कार केला. यावेळी दिनेश मोटे, साई शिंदे आदी उपस्थित होते.