नांदेड : मागील काही दिवसांपासून पेट्रोलच्या भावात भरमसाट वाढ होत असल्यामुळे वाहनधारकांच्या खिशाला कात्री लागली आहे. दररोज लागणारे इंधन व त्यावरील होणारा खर्च हा सर्वसामान्यांना परवडत नसल्याच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत.
११० रुपये पेट्रोल झाल्यामुळे प्रत्येकच पेट्रोल भरताना काटकसर करताना दिसत आहे. अनावश्यक फिरण्यावर निर्बंध आले असून, अनेकांनी गाड्या वापरणेही बंद केले आहे. कोरोना काळात वाहन वापरणे परवडत नसल्याचे चित्र आहे.
पगार कमी, खर्चात वाढ
नोकरीनिमित्त रोज १५ किलोमीटर जाणे व १५ किलोमीटर येणे असा प्रवास करावा लागत आहे. तसेच शहरातून जाताना अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी असते. त्यामुळे वाहनातील इंधन त्यामध्ये खर्च होते. पेट्रोलचे वाढलेले भाव व त्यावर होणारा खर्च परवडत नाही. त्यामुळे वाहनावर जाणेसुद्धा अवघड झाले आहे. पगाराच्या तुलनेत खर्च वाढला आहे - एम. डी. बुक्तरे.
दोन वर्षांपूर्वी मोठ्या हौशेने आम्ही कार घेतली. त्यानंतर पेट्रोलच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. सध्या कार बाहेर काढणे म्हणजे खिशाला मोठी झळ बसणे आहे. त्यामुळे अनेकदा दुचाकी वाहनावरूनच शहरातील ये-जा करण्यात येत आहे. त्यामुळे चारचाकी वाहन केवळ घरासमोर उभे करण्यासाठी राहिले आहे. - एन. जी. लोखंडे.
कोरोनामुळे खर्चात भर; पाचशेच्या ठिकाणी हजार
कोरोनामुळे सुरक्षिततेला अधिक महत्त्व आले आहे. प्रत्येकजण स्वत:चे वाहन वापरण्यावर भर देत आहे. अनेकजण महत्त्वाच्या कामासाठी चारचाकी वाहनाचा उपयोग करतात. गेल्या दोन वर्षांपासून खासगी वाहनाने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. गर्दी टाळण्यासाठी स्वत:चे वाहन बरे म्हणून अनेकांनी मधल्या काळात चारचाकी वाहनांची खरेदी केली. मात्र, त्यानंतर इंधनाचे भाव सतत वाढल्यामुळे वाहन मालक आर्थिक अडचणीत आले आहेत.