लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : पेट्रोल आणि डिझेलची शंभरीकडे जोरदार घोडदौड सुरु असून मध्यंतरी दोन दिवस दर स्थिर राहिल्यानंतर पुन्हा एकदा दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतच आहेत़ ७ सप्टेंबर रोजी नांदेडात पेट्रोल ८८ रुपये ९७ पैशांवर गेले होते़ त्यामध्ये आठवड्याभरातच २६ पैशांनी वाढ होवून शुक्रवारी नांदेडात पेट्रोलचे दर ९०़२३ लिटरवर पोहचले होते़ तर रविवारी ते ९०़८५ पैशांवर गेले होते़ गेल्या सव्वा महिन्यात पेट्रोलच्या किमती तब्बल सहा रुपयांनी वाढल्या आहेत़पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य हैराण झाले आहेत़ दररोज पेट्रोलच्या किमतीत सातत्याने वाढ होत असून गेल्या सव्वा महिन्यातच पेट्रोल जवळपास सहा रुपयांनी वाढले आहे़ साधारणत: जुलै महिन्यापासून ही वाढ होत आहे़ १ आॅगस्टला नांदेडात पेट्रोल ८५़२८ पैसे तर डिझेल ७२़३९ पैसे लिटर होते़त्यामध्ये दररोज काही पैशांनी वाढच होत गेली़ पाचच दिवसांत ६ आॅगस्टला पेट्रोल ८६ रुपये १ पैसा तर डिझेल ७३ रुपये १२ पैसे प्रतिलिटर झाले होते़ १५ आॅगस्टला पेट्रोल ८६़१८ तर डिझेल ७३़४१ पैशावर गेले होते़ आॅगस्टअखेर २७ तारखेला पेट्रोल ८६़९२ तर डिझेल ७४़१२ रुपयावर गेले होते़ ७ सप्टेंबरला नांदेडात पेट्रोलचे दर ८८़९७ तर डिझेल ७६़८८ रुपयांवर गेले होते़ त्यानंतर १४ सप्टेंबरला नांदेडात पेट्रोल ९०़२३ पैसे तर डिझेल ७८़१५ पैशावर पोहोचले होते़ शनिवारी पेट्रोल ९०़५८ तर डिझेल ७८़४० पैशावर पोहोचले होते़ त्यामध्ये रविवारी पुन्हा वाढ झाली़रविवारी पेट्रोल ९०़८५ तर डिझेल ७८़५९ पैशावर पोहोचले होते़ सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे मात्र सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे़ येत्या पंधरा ते वीस दिवसांतच पेट्रोल शंभरी गाठणार असल्याचा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविला आहे़ त्यामुळे सर्वसामान्यांना आणखी झळ बसणार आहे़
नांदेड शहरात पेट्रोल ९०़८५ रुपयांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 12:37 AM