नांदेड : साधू परिवाराने घेतलेल्या निर्णयामुळे कमीत कमी पाच रुग्णांना दिलासा मिळेल. ब्रेन डेड झालेल्या सूर्यकांत साधू यांचे अवयव आज नांदेडमधुन ग्रीन कॉरिडोरद्वारे छत्रपती संभाजीनगर येथे पाठण्यात येणार आहे. या निर्णयामुळे तिघांना जीवदान तर दोघांना दृष्टी मिळण्याची शक्यता आहे.
वजीराबाद भागातील रहिवासी सूर्यकांत साधू (वय ७२) यांना अचानक पक्षघाताचा झटका आला. त्यामुळे त्यांना शिवाजीनगर भागातील एका खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले. शर्थीचे प्रयत्न करूनही प्रकृतीमध्ये सुधारणा होत नव्हती. त्यातच आपल्या वडिलांचा मेंदू मृत झाल्याचे कळल्यानंतर डॉ. दीपक साधू यांनी आपल्या वडिलांचे अवयव दान करण्याचा निर्णय रविवारी रात्री घेतला. हा प्रस्ताव डॉक्टरांसमोर मांडला. अशा भावनिक परिस्थितीतही दीपक साधू यांच्या मातोश्री शोभाताई यांनीही अवयव दान करण्यास होकार दिला. त्यानंतर डॉक्टरांची टीम ग्रीन कॉरिडोर च्या तयारीला लागली. आज रविवारी पहाटे छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टरांची एक टीम शहरातील एका खाजगी रुग्णालयात पोहोचली. त्यानंतर सुरू झाली ती एकच धावपळ डॉक्टरांची आणि ग्रीन कॉरिडोर यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि पोलिसांची दोन किडनी, एक लिव्हर दोन डोळे उपयोगी पडतील, असे डॉ. दापकेकर यांनी सांगितले.
मागील काही दिवसांपासून सूर्यकांत साधू (वय ७२ रा.नांदेड) हे उपचार घेत होते. साधू यांचे ब्रेन हॅमरिंग झाल्याने त्यांचा मुलगा डॉ. दिपक यांनी अवयव दानाचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे दोन किडनी, एक लिव्हर, दोन डोळे आहेत. एक किडनी छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम हाॅस्पीटल येथे बाय रोड तर, एक किडनी नांदेड येथील ग्लोबल रुग्णालयात तसेच लिव्हर संभाजीनगर येथील कमलनयन बजाज रुग्णालय येथे विमानाने पाठविण्यात येणार आहे तर डोळे नांदेडच्या डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे देणार आहोत. - डॉ विद्याधर भेदे, संचालक ग्लोबल रुग्णालय, नांदेड