- गोविंद कदमलोहा- तालुक्यातील बेरळी येथिल एका तरुणाने मतदान करतानाचा ईव्हीएम आणि व्हीव्ही- पॅटसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला. हा फोटो शेअर करणे तरुणास महागात पडले आहे. प्रमोद होळगे असे या तरुणाचे नाव असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान पार पडले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५२.४७ टक्के मतदान झाले होते. अनेक मतदार उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी केंद्रावर दाखल झाले. एका केंद्रावर १०५ वर्षांच्या आजीने मतदान केले तर एका केंद्रावर नव वधू - वराने लग्नापूर्वी मतदानाचा हक्क बजावला. अनेकांनी मतदान करून आल्यानंतर सेल्फी काढत मतदान करण्याचे आवाहन केले. मात्र, लोहा तालुक्यातील बेरळी येथील एका युवकाने केंद्रात मतदान करतानाच ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा फोटो व्हायरल केला. प्रमोद होळगे असे या युवकाचे नाव आहे. त्याने फेसबुकवर हा फोटो शेअर करत आचारसंहितेचा भंग केला.
दरम्यान, ही बाब निदर्शनास येताच सहाय्यक निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार यांनी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी होळगे याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याच्या आदेश दिले. एफएसटी पथकातील आदर्श कांबळे यांच्या फिर्यादीवरुन लोहा पोलीस ठाण्यात आचार संहिताभंग व लोकप्रतिनिधी कायदा या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिगंबर बगाडे हे पुढील तपास करत आहेत.
मतदान न करता कुऱ्हाडीने फोडले ईव्हीएम मशीनदुसरीकडे बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथे मतदान करण्यासाठी आलेल्या एका तरुणाने मतदान केंद्रात प्रवेश करताच ईव्हीएम मशीनसह व्हीव्हीपॅट व इतर साहित्याची कुऱ्हाडीने नासधूस केली. तरुणाच्या हातात कुऱ्हाड पाहून केंद्रावरील निवडणूक अधिकारी व इतर कर्मचारी आणि एजंट यांनी केंद्रातून बाहेर पळ काढला. तद्नंतर पोलिसांनी सदर तरुणाला ताब्यात घेतले.