लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : देशात धार्मिक मुद्यांच्या आधारावरच निवडणुका लढवल्या जात आहेत. त्या जिंकल्याही जात आहेत. अशा परिस्थितीत पुरोगामी विचारांच्या लोकांकडे संविधान हे मोठे हत्यार आहे. देशातील बहुजनांना एकत्र आणण्यासाठी ते उपयुक्त ठरणार आहे, असा विश्वास विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी व्यक्त केला.
नांदेडमध्ये शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात अर्थात गौरी लंकेश स्मृती परिसरात रमाई विचारमंचावर झालेल्या पहिल्या आंबेडकरी विचारवेध संमेलनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रा. नंदन नांगरे, डॉ. प्रकाश मोगले, डॉ. आदिनाथ इंगोले, स्वागताध्यक्ष अरुण दगडू, मुख्य संयोजक डॉ. हेमंत कार्ले, डॉ. राजेंद्र गोणारकर, प्रशांत वंजारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. मनोहर म्हणाले, देशात हिंदू राष्ट्रवाद रुजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी हिंदू धर्म हा प्रतिगाम्यांकडे सामर्थ्याचा मुद्दा आहे. याच मुद्यावर निवडणुकाही जिंकल्या जात आहेत. धर्माची समीक्षा करावी लागणारच आहे; पण त्याचवेळी आता पुरोगामी विचारांचा एकत्र येवून लढा उभारावा लागणार आहे. देशात महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कार्ल मार्क्स यांच्या तत्त्वज्ञानातील साम्य व मतभेदाची चर्चा होते. हे विचार एकत्रित आणण्याबाबतही काही पातळीवर प्रयत्न होत आहेत. मात्र हे एकत्रिकरण सर्वांना बांधून ठेवणारे राहणार नाही. त्यामुळे क्रांतीसाठी आता एक नवा सिद्धांत तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
पुरोगाम्यांना आता संविधानाच्या बळावरच लढावे लागणार आहे. या देशात त्यांना पाठिंबाही मिळेल. पुरोगामींसाठी फुले-शाहू-आंबेडकर हे क्रांतीचे त्रिशरण आहे. त्यांच्या विचारांचे अनुकरण केले तरच त्यांना संविधानाशी नाते सांगता येईल, असे डॉ. मनोहर यांनी स्पष्ट केले. या आंबेडकरी विचारवेध संमेलनात ‘आंबेडकरवादाला अभिप्रेत असलेले पर्यायी जग’ या विषयावर कॉ. अण्णा सावंत, डॉ. वंदना महाजन, डॉ. अशोक गायकवाड यांनी विचार मांडले तर ‘आंबेडकरी चळवळ आणि जातीअंताची क्रांती’ याविषयी डॉ. अशोक पळवेकर, डॉ. प्रकाश राठोड यांनी विचार मांडले. ‘समाजवाद, सेक्युलॅरिझम आणि आंबेडकरवाद’ या विषयावर बोलताना डॉ. अन्वर राजन यांनी कोणतेही राष्ट्र हे धर्माधिष्ठित असू शकत नसल्याचे सांगितले. धर्मातीत अनेक बाबी कालबाह्य झाल्या आहेत. त्यामुळे आधुनिक राष्ट्र म्हणून उदयास येताना धर्माला बाजूला ठेवून विज्ञानाची कास धरावी लागते, असेही त्यांनी स्पष्ट केले. डॉ. अक्रम पठाण यांनीही विचार मांडले. अध्यक्षस्थानी डॉ. सतेश्वर मोरे होते.
कविसंमेलनास प्रमोद वाळके यांच्या गझलने प्रारंभ झाला. डॉ. डॉ.विजयालक्ष्मी वानखेडे यांनी ‘गावकुसाबाहेरच्या बाया’ ही कविता सादर केली तर प्राचार्य यशवंत खडसे यांनी आरक्षण याविषयी आपली रचना सादर केली. अनिल कांबळे, हेमंतकुमार कांबळे, मोहन सिरसाठ, रमेश सरकाटे, जनार्धन मोहिते यांनी आपल्या रचना सादर केल्या. कविसंमेलनाच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभा अहिरे यांनी एक दीर्घ कविता तसेच ‘पंख पसरेन म्हणते’ ही गेय कविता सादर केली. यावेळी उपस्थित कवींच्या आग्रहास्तव डॉ. यशवंत मनोहर यांनीही आपली ‘जपून रे माझ्या फिनीक्स पक्ष्यांनो खूप इथे आपला वध झाला आहे’ ही कविता सादर करुन सर्वांना मंत्रमुग्ध केले. या संमेलनासाठी डी. टी. गायकवाड, साहेबराव पवार, संजय वाघमारे, मिलिंद राऊत, जयप्रकाश वनंजे, मिलिंद दरबारे, उत्तम तांबळे, डॉ. विलास ढवळे, मिलिंद ढवळे, अनुरत्न वाघमारे, दीपक सपकाळे, सुरेश वनंजे आदींनी परिश्रम घेतले.