राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तीन हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यात कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातील रस्त्यांचा समावेश आहे. खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. टप्प्याटप्प्याने कामे करून नांदेडकरांसह राज्यातील जनतेचा प्रवास सुखमय व्हावा यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे चव्हाण म्हणाले.
मराठा आरक्षणाबाबत अशोकराव चव्हाण म्हणाले, आरक्षणास काँग्रेसचे समर्थनच आहे. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागू देता मराठा आरक्षण कसे देता येईल, या अनुषंगाने राज्य शासनास जे जे काही करता येईल, ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच संभाजीराजेंचा मी नेहमीच आदर केलेला आहे. त्यांची आणि माझी मुंबईत भेट झाली. आरक्षणाबाबत गटनेत्यांसह घटक पक्षातील सर्व नेत्यांची भेट घेतली.
चौकट....
चार जिल्ह्यांची आढावा बैठक
नांदेडात २४ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता भक्ती लॉन्स येथे नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली या चार जिल्ह्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्याचबरोबर सकाळी दहा वाजता कुसुम सभागृह येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या प्रारंभाचे औचित्य साधून व्यर्थ न हो बलिदान, चलो बचाए संविधान याअंतर्गत जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या परिवारातील सदस्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
कट्टरतावाद अखंडतेला घातक
भाजप धर्मवाद आणि कट्टरतावादाकडे देशाला घेऊन जात आहे. ही बाब लोकशाहीसह देशाच्या अखंडता आणि एकात्मतेसाठी घातक आहे. त्याला वेळोवेळी सडेतोड उत्तर देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यामुळेच काँग्रेसची आयडालॉजी पुन्हा लोकांपर्यंत घेऊन जाण्याचे काम काँग्रेसने हाती घेतले आहे. नवतरुणांना स्वातंत्र्याचा खरा इतिहास कळावा यासाठीही काँग्रेसकडून प्रयत्न सुरू असल्याचे अशोकराव चव्हाण यांनी सांगितले.
पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचाच उमेदवार
महाविकास आघाडीच्या धोरणात्मक निर्णयानुसार ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा आमदार होता, त्या ठिकाणी त्याच पक्षाचा उमेदवार दिला जाणार आहे. त्यामुळे देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचाच उमेदवार राहील आणि तो शंभर टक्के विजयी होईल, असा विश्वास अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केला.