धर्माबाद ( नांदेड ): तालुक्यातील राजापूर येथील गावात भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून, दीड महिन्यांपूर्वी खोदून ठेवलेल्या नालीचे बांधकाम अद्याप केले नाही. त्यामुळे येथील युवक विलास शिंदे यांनी संतापून २१ एप्रिल रोजी दुपारी गावातील नालीत उतरून नालीच्या घाण पाण्याने आंघोळ करून ग्रामपंचायतीचा निषेध केला आहे.
गेल्या पाच वर्षांपासून ग्रामपंचायतीमार्फत पिण्याचे पाणी वेळेवर मिळत नाही, याचा त्रास गावकऱ्यांना होत आहे. गावकऱ्यांना खासगी बोअरधारकाकडून विकत पाणी घ्यावे लागते. जलजीवन योजनेसाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. परंतु त्या योजनेतून पाणी मिळत नाही. नाली रस्ते, अंगणवाडी, शाळेसाठी भरपूर निधी येऊन सुद्धा येथे कामे केली जात नाही. नाली खोदून दोन महिने झाले. मात्र अद्याप बांधकाम केले जात नाही. नालीत लहान मुले, गुरेढोरे पडत आहेत. नालीचे घाण पाणी रस्त्यावर येत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, असे असताना येथील ग्रामपंचायत काहीच हालचाली करत नसल्याचे विलास शिंदे यांनी सांगितले.
परस्पर बिले उचलून निधी हडपराजापूर ग्रामपंचायतीला विकासासाठी विविध योजनेच्या माध्यमातून निधी आला आहे. पण सदर ग्रामसेवक यांनी दोन महिन्यांपूर्वी परस्पर बिले उचलून निधी हडप केल्याची तक्रार उपसरपंच यांनी केली आहे. सदरील ग्रामसेवक निलंबित असून, ग्रामपंचायतीचा निधी ग्रामसेवकाने उचल केला आहे, त्यामुळे आता गावातील कामे कोणी करावे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.