नांदेड : पर्यावरणाचा होणारा ऱ्हास टाळण्यासाठी शासनाने प्लास्टिक बंदी केली आहे़ त्यातच प्लास्टिकजन्य कचरा होऊ नये म्हणून शासकीय कार्यालय आणि शासनाकडून घेण्यात येणाऱ्या कार्यक्रम, बैठकांमध्ये आता प्लास्टिकच्या पाणी बाटल्या वापरू नये, असे आदेश राज्य शासनाने दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने सर्व विभागांना प्लास्टीक बाटल्या बंद करण्याच्या सूचना केल्या आहेत़
नांदेड वाघाळा महापालिका प्रशासनाने आदेश काढून १ मार्चपासून कार्यालयात प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा वापर करू नये, असे निर्देश दिले आहेत़ कोणत्याही कार्यालयात अथवा बैठकीत प्लास्टिकची पाणी बॉटलचा वापर करताना निदर्शनास आल्यास सदरील कार्यालयप्रमुखांविरुद्ध महाराष्ट्र अविघटनशील कचरा (नियंत्रण) अधिनियम २००६ मधील तरतुदीत नमूद केल्यानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे़ पिण्याच्या पाण्याच्या पीईटी किंवा पीईटीई बाटल्यांवर राज्य शासनाने बंदी घातली आहे़ त्यामुळे अशा पाण्याच्या बाटल्यांचा वापर कार्यालयातील विविध बैठकीत, कार्यक्रमांत तसेच दैनंदिन काम करत असताना कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी करू नये, असेही म्हटले आहे़ प्लॅस्टिकजन्य वस्तूंचा वापर न करणे व त्यातून होत असलेल्या प्लॅस्टिकजन्य कचरा निर्मितीवर आळा घालण्यासाठी हा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे़ सदर आदेशाची नांदेड शहर व परिसरात कठोर अंमलबजावणी करण्यासाठी शासकीय, निमशासकीय, महामंडळे, इतर संस्था व कार्यालयांनी कार्यालयात पिण्याच्या पाण्यासाठी प्लॉस्टिकच्या बाटल्यांचा वापर करु नये़ कार्यालयात पाणी पिण्यासाठी कागदी, स्टील अथवा स्टिलचे ग्लास ठेवण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना महानगरपालिका प्रशासनाने संबंधीत कार्यालयाच्या प्रमुखांना एका पत्रकाद्वारे दिल्या आहेत़
पर्यायी साधनांचा वापर अन् उपलब्धता गरजेचीच्निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्लास्टिक बॉटलला हद्दपार करणे गरजेचे आहे़ त्याअनुषंगाने शासनाने घेतलेल्या निर्णयाचे नागरिकांसह प्रशासनात काम करणाऱ्या प्रत्येकांने स्वयंस्फुर्तपणे स्वागत केले पाहिजे़ एकवेळ वापरून फेकून दिल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या बॉटल वापरणे स्वत: पासून बंद करणे गरजेचे आहे़ शासकीय कार्यालयात शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे़ तसेच पाणी पिण्यासाठी काच, स्टीलचा स्वच्छ ग्लास उपलब्ध करून द्यावेत, बाहेरून येणाऱ्यांसाठी पाण्याची व्यवस्था करणेही गरजेचे आहे़
- डॉ़पुष्पा गायकवाड, पर्यावरण अभ्यासक़