अपात्र लाभार्थी यांचेकडून ५७ लाख ७० हजार होणार वसूल
कंधारः तालुक्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत करभरणा करणारे व इतर अशा ६१९ अपात्र लाभार्थ्यांचा शिरकाव झाला आहे. असा योजनेचा लाभ घेतला असलेल्यांकडून ५७ लाख ७० हजार वसुली केली जाणार आहे.आतापर्यंत २६ खातेदारांनी २ लाख ३४ हजार रू.भरणा केला असल्याचे समोर आले आहेत. रक्कमा न भरणाऱ्यांवर फौजदारी कार्यवाही केली जाणार असल्याच्या भितीने अपात्र असलेल्यांमध्ये मोठी खळबळ माजली आहे.
तालुक्यात जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटणकर यांनी दिलेल्या निर्देशानुसार केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पंधरवड्यात विशेष मोहीम राबविण्यात आली.त्यात विविध स्तरावर दुरूस्तीसाठी प्रलंबित असलेला डाटामध्ये आवश्यक ती दुरूस्ती करून निकाली काढणे ,पी.एम.किसान पोर्टलवरील लाभार्थ्याची ५ टक्के भौतिक तपासणी पूर्ण करणे व करभरणा केलेल्या शेतकऱ्यांच्या प्राप्त माहितीनुसार त्यांना दिलेल्या लाभाची वसुली करणे आदी करण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार तालुक्यात मोहीम राबविण्यात आली.
तालुक्यात करभरणा करणारे अपात्र लाभार्थी ४८५ असल्याचे समोर आले आहे.अशा अपात्र लाभार्थ्यानी ४६ लाख २२ हजार रक्कम उचलली असून त्यांच्याकडून वसुली करण्यात येत आहे.आतापर्यंत २६ जणांकडून २ लाख ३४ हजार रक्कम वसूल करण्यात आली आहे. वसुली प्रक्रिया जलदगतीने केली जात आहे. फौजदारी कार्यवाही करण्याच्या भितीने अपात्र असलेल्या नागरिकांत धडकी भरली आहे .इतर अपात्र लाभार्थी संख्या १३४ आहे.त्यांची वसुली रक्कम ११ लाख ५८ हजार अशी आहे.
केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या आधार देणारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबविण्यात येत आहे.तालुक्यात एकूण लाभार्थी संख्या ४६ हजार २५८ आहे .लाभार्थ्यांना दर चार महिन्यांंना प्रति लाभार्थी २ हजार प्रमाणे वर्षाला ६ हजार दिले जातात.आतापर्यंत कोट्यवधी रूपये वितरित करण्यात आले आहेत.सामान्य शेतकऱ्यांना आधार देणाऱ्या योजनेला काहींनी सुरूंग लावला असल्याचे बोलले जात आहे.परंतु शासनाने अशांना शोधून वसुलीचा बडगा उगारला आहे.आणि भरणा केला नाही तर फौजदारी कार्यवाही करण्याची सक्त ताकीद दिली आहे. अपात्र लाभार्थ्यांनी तत्काळ लाभ घेतलेल्या रक्कम शासनास परत करावी अन्यथा फौजदारी कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार व्यंकटेश मुंढे व नायब तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिली.