धमार्बाद (जि. नांदेड) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील १४ विद्यार्थ्यांना दूषित अन्न व पाण्यामुळे विषबाधा झाल्याचे आज समोर आले. वसतिगृहातील काही विद्यार्थ्यांना अचानक जुलाब, उलट्या, पोट दुखणे, मळमळ सुरु झाल्याने ग्रामीण रूग्णालयात दुपारी उपचारासाठी दाखल केले. त्यातील एका विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक आहे.
येथील शासकीय वसतिगृह भाड्याच्या इमारतीत असून ७० ते ९० विद्यार्थी येथे राहतात. त्यांना महिना भरापासून पिण्याचे दूषित पाणी व अन्न मिळत आहे. त्यामुळे आज वसतिगृहातील १४ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. यामध्ये गौरव येवतीवाड, मन्मथ शिवशेट्टे, गौरव वाघमारे, साईनाथ गिरी, सारीपुत्र, सोनटक्के, सुमित अबुलकोड, मारोती डब्बेवाड, विलास चरके, अविनाश तुंटे, अविनाश काबंळे, शिवाजी कारले, ज्ञानेश्वर नरडेवाड, सज्जन सोनकांबळे, ज्ञानेश्वर कानगुले यांचा समावेश आहे.यातील ज्ञानेश्वर कानगुले या विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष विद्यार्थ्यांनी प्रकृती बिघडल्याचे संबंधित विभागाला सांगूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तसेच त्यांच्यासोबत उपचारासाठी रूग्णालयापर्यंत वसतिगृहाचा सेवकसुद्धा आला नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.