नांदेड : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मागील वर्षी झालेल्या आंदोलनात पोेलिसांवर दगडफेक करुन जखमी करणाऱ्या अनेकांच्या विरोधात गुन्हे नोंदविण्यात आले होते़ यातील दोन आरोपींना नांदेड ग्रामीण पोलिसांनी पकडले आहे़निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून तत्पूर्वीच पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी जिल्ह्यातील फरार, पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पथकांना आदेश दिले आहेत़ तसेच दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना नोटिसा बजावल्या होत्या़ त्याचबरोबर व्हॉट्सअॅप ग्रुपवरही कडक नजर ठेवण्यात येत आहे़ त्यात नांदेड ग्रामीण पोलिसांनी वडगाव येथील दोघांना अटक केली आहे़ गतवर्षी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेड-आमदुरा रस्त्यावर आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको केला होता़ यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती़ या दगडफेकीत अनेक पोलीस जखमी झाले होते़ याप्रकरणी तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या आदेशावरुन अनेक आंदोलकांवर गुन्हे नोंदविण्यात आले होते़ त्यातील वडगावचे गोविंद संभाजी पुयड आणि विजय संभाजी पुयड या दोघा भावांना अटक केली़
पोलिसांवर हल्ला; दोघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:51 AM