मुदखेड : गोमांस विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यावरुन पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे विक्रीचालकावर कारवाई करण्यासाठी गेले असता, त्यांच्या कामात अडथळा निर्माण करण्यात येवून काही जणांनी धक्काबुक्की केल्याचा प्रकार २२ मार्च रोजी घडली. पोलिसांनी याप्रकरणी ३० जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.‘तुम्ही पोलीसवाले आमच्याकडून हप्ता घेत असतात, तरीही कारवाई का करता?’ असे म्हणून जमावाने पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांच्याशी वाद घातला. याच दरम्यान शिंदे व जमाव पोलीस ठाण्याकडे निघाले. संबंधित घटनेचा व्हिडीओ करुन तो व्हायरल करण्यात आला. शिंदे यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याप्रकरणी एकूण सात जणांवर व इतर ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यांची माहिती दिली. कारवाई करण्यात आलेली नावे अशी-मोहम्मद कासीम मोहम्मद कुरेशी, मोहम्मद एकबाल कुरेशी, मोहम्मद अलीम अब्दुल कुरेशी, मोहम्मद गफार मोहम्मद मदार कुरेशी, मोहम्मद साजीद मोहम्मद उस्मान, मोहम्मद मुस्सा मोहम्मद बाबू कुरेशी, मोहम्मद नाशीर कुरेशी. तपास पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.नितीन खंडागळे करत आहेत.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी मुदखेड येथे भेट दिली. आगामी काळ हा निवडणुकांचा असून मुदखेड तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे. कायदा हातात घेतल्यास त्यांची गय केली जाणार नाही, असे पवार यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब देशमुख, पोलीस निरीक्षक सोहन माछरे आदी उपस्थित होते.